Goa: चुका दाखवून देता ना? मग चांगले काम झाल्यावर शाबासकी पण द्या :वीजमंत्री सुदिन ढवळीकर
By आप्पा बुवा | Published: June 12, 2023 07:24 PM2023-06-12T19:24:38+5:302023-06-12T19:24:59+5:30
Goa: वीज खात्यात काम करत असताना अभियंताकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून चुका होणे हे स्वाभाविकच आहे. परंतु झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कटाक्षाने लक्ष देत आहोत.
- अप्पा बुवा
फोंडा - खांडेपार पंचायत क्षेत्रातील लोकांना वीज खात्यासंबंधीत कामे घेऊन उसगावला जावे लागायचे. ती समस्या लक्षात घेऊन कृषी मंत्री रवी नाईक व पंचायतीने खांडेपार पंचायत क्षेत्रातच सेक्शन ऑफिस असावे अशी मागणी करून पाठपुरावा केला होता . सदर कार्यालयासाठी जागा मिळवून देण्यासाठी सुद्धा रवी नाईक यांनीच प्रयत्न केले.आज त्या कार्यालयाचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. असे उद्गार वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले. खांडेपार पंचायत इमारतीच्या तळमजल्यावरील वीज खात्याचे सेक्शन ऑफिस सुरू करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी, पंच सदस्य बाबू चारी, निळकंठ नाईक ,कार्यकारी अभियंता भरतन आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मागच्या एक वर्षात वीज खात्याचा संपूर्ण कायापालट करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहे. या कामी मुख्यमंत्र्यांनी दिलेले सहकार्य आम्ही विसरणार नाही. वीज खात्यात काम करत असताना अभियंताकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून चुका होणे हे स्वाभाविकच आहे. परंतु झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कटाक्षाने लक्ष देत आहोत.
राज्य कारभार पुढे नेत असताना टीका ह्या होणारच परंतु टीका करणाऱ्या लोकांनी सकारात्मक टीका करावी. त्याचबरोबर दोष दाखवून द्यावे. जर काही चांगले काम होत असेल तर त्या कामाचा बद्दल समाधान सुद्धा व्यक्त व्हायला हवे.