१८ महिन्यांत कर्करोग इस्पितळ; विश्वजित राणे यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 09:35 AM2024-07-19T09:35:16+5:302024-07-19T09:36:09+5:30

दक्षिण जिल्हा इस्पितळ सरकारच चालवणार

cancer hospital in 18 months information from vishwajit rane  | १८ महिन्यांत कर्करोग इस्पितळ; विश्वजित राणे यांची माहिती 

१८ महिन्यांत कर्करोग इस्पितळ; विश्वजित राणे यांची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कर्करोग इस्पितळ पुढील १८ महिन्यात कार्यरत होईल. टाटा मेमोरियलने सरकारला आवश्यक ते सहकार्य दिले असून गोमेकॉत ओन्कॉलॉजी ओपीडीही लवकरच सुरू होईल. शिवाय 'सेंटर ऑफ एक्सलन्स' येईल. काही गोष्टी आउटसोर्स कराव्या लागतील. परंतु, दक्षिण जिल्हा इस्पितळ सरकारच चालवणार आहे ते तिसऱ्याच्या हातात देणार नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल विधानसभेत स्पष्ट केले.

आरोग्य खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले की, पुढील दोन ते तीन महिन्यात कर्करोग निदान करणारे 'पेंट स्कॅन' मशीन कार्यरत होईल. टाटा मेमोरियलच्या संचालकांची थेट पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा झालेली आहे. त्यांनी आम्हाला एक स्ट्रक्चर दिले आहे त्यानुसार सर्व काही होईल.

राज्यात कर्करोग तसेच मधुमेहाची प्रकरणे वाढत असल्याने दोन्ही अधिसूचित करून रजिस्ट्री तयार केली जाईल. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना व्यापक करून आणखी काही आजारांचा अंतर्भाव केला जाईल. सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी सरकारचा प्राधान्यक्रम आहे. मधुमेह झालेल्या रुग्णाला इन्सुलिन मोफत देणारे गोवा पहिले राज्य असल्याचेही मंत्री राणे म्हणाले.

राणे म्हणाले की, गोमेकॉमध्ये सोडेक्सोला कंत्राट दिल्यानंतर जेवण, खाणाची परिस्थिती सुधारली. जेवण दिल्यानंतर चाळीस मिनिटात सर्व काही साफ दिसले पाहिजे अशी व्यवस्था केली आहे. वॉर्डा मधील खाटांवरच्या चादरी रोज बदलल्या जातात पूर्वी असे होत नसे. गोव्यात वैद्यकीय शिक्षण घेऊन जे बाहेर गेले आहेत त्यांना परत आणण्याचा प्रयत्न राहील. डॉ. अमन प्रभूदेसाईंसारख्यांना आम्ही आणले व सिनियर कन्सल्टंट म्हणून नेमले. डॉक्टर गुरुप्रसाद यांनाही आणले.

कार्डियाक रुग्णवाहिकांची संख्या वाढवली जाईल. राज्यात सर्वत्र वेलनेस सेंटर उभारण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. दुचाकी अॅम्बुलन्स वाढवल्या जातील. कर्करोगाचे निदान करण्यासाठी पॅट स्कॅन सुविधा झाल्यानंतर लोकांना केएलई किंवा इतर इस्पितळांमध्ये निदानासाठी जावे लागणार नाही. नवजात अर्भकाचे स्क्रीनिंग यशस्वीरित्या चालू आहे.

द. गो. जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण ही अफवाच

मंत्री राणे म्हणाले की, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण केले जाणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे योग्य नव्हे. काही गोष्टी आऊटसोर्स केल्या तरी इस्पितळ सरकारच चालवणार आहे, कोणी त्यामुळे ही भीतीर बाळगू नये, नर्सिंग कॉलेज सुरू करावे की नाही हे चर्चेअंती ठरवले जाईल. इस्पितळाच्या खासगीकरणाबद्दल मी कधीच बोललेलो नव्हतो. तिसऱ्याच्या हातात इस्पितळ देणार नाही. संख्या वाढवण्याची गरज असून त्या दृष्टीने पावले उचलली जातील. स्मृतीभ्रंश रुग्णांसाठी उपचारांची विशेष सोय केली जाईल.

आयव्हीआरला प्रतिसाद 

अपत्य नसलेल्या दांपत्यांना भोंदू डॉक्टर फसवण्याचे प्रयत्न प्रकार करत असतात. कोल्हापूर येथील एका डॉक्टरने राज्यातील एका महिलेला अशाच प्रकारे सात ते आठ लाख रुपयांना लुबाडल्याची घटना मला माहित आहे. गोमेकॉत आयव्हीआर निदान सुरू झाल्यानंतर लोक आता येथे येऊ लागले आहेत. रोज रांगा लागत असून उपचारांमध्ये यशही मिळत आहे. राज्यात १२२० रुग्णांमध्ये १ डॉक्टर असे प्रमाण आहे. रस्ता अपघात वाढले असून न्यूरोलॉजी विभाग महत्त्वाचा ठरत आहे.

यकृत रोपणाच्या शस्त्रक्रियाही होतील

राणे म्हणाले की, डॉ. अमित मायदेव यांच्यासारखे तज्ज्ञ डॉक्टर आम्ही आणले. ते पद्मश्री असून गोमेकॉत 'गेस्ट्रोलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यकृत रोपणाच्या शस्त्रक्रिया तसेच एंडोस्कोपीच्या शस्त्रक्रियाही ते आल्यानंतर होऊ शकतील, डॉ. मायदेव हे प्रशिक्षित डॉक्टरही आणणार आहेत.

आयपीएचबी नाव बदलणार

बांबोळी येथील मनोरुग्णालय (आयपीएचबी) चे नव्याने नामकरण करण्यात येणार आहे. कारण या इस्पितळात एखादी व्यक्ती उपचारासाठी दाखल झाल्यानंतर लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. न्यूरो सायन्स इन्स्टिट्यूट किंवा अशाच प्रकारचे वेगळे नाव आम्ही देणार आहोत.

'कोणतीही फाईल अडवली नाही'

आरोग्य खात्याचे बजेट यावेळी कमी केल्याने विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांकडून योग्य सहकार्य मिळत नाही का? असा त्यांचा सवाल होता त्यावर मंत्री विश्वजित राणे यांनी तसे काहीच नसल्याचे सांगून मुख्यमंत्री वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात. तसेच आम्ही चर्चा करूनच सर्व गोष्टी करतो, असे स्पष्ट केले तर मुख्यमंत्री म्हणाले की, यावेळी बजेटमध्ये तरतूद कमी दिसत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. आरोग्य क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद बांधकाम खात्याच्या अंदाजपत्रकात केलेली आहे. त्यामुळे कोणीही वेगळा अर्थ काढू नये. मी आरोग्य खात्याची किंवा विश्वजित यांनी पाठवलेली कोणतीही फाईल आतापर्यंत कधीही अडवलेली नाही. हवे तर विश्वजीत यांनाच विचारा.

 

Web Title: cancer hospital in 18 months information from vishwajit rane 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.