राज्यात १६ महिन्यांत उभारणार कॅन्सर इस्पितळ: आरोग्यमंत्री राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 12:38 PM2024-02-05T12:38:03+5:302024-02-05T12:39:03+5:30
कॅन्सरवरील ४.२० लाखांचे इंजेक्शन गोमेकॉत मोफत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्तन कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा देणारा निर्णय गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने घेतला आहे. या रोगावर प्रभावी ठरणारे ४.२० लाख रुपये किमतीचे इंजेक्शन मोफत देण्यास सुरुवात केली आहे. गोमेकॉत रुग्णाला अशा प्रकारे पहिले इंजेक्शन रविवारी देण्यात आले. महागडे इंजेक्शन मोफत देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. जागतिक कॅन्सर दिनानिमित्त रविवारी या इंजेक्शनचा पहिला लाभ देण्यात आला.
दरम्यान, गोव्यातील स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटलची उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. पुढील १६ महिन्यांत ते पूर्ण होईल असेही ते म्हणाले. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आरोग्य खात्याने गेल्या काही वर्षांत एक लाखांपेक्षा अधिक महिलांची तपासणी केली आहे. पुढील वर्षभरात आणखी दीड लाख महिलांची तपासणी करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
महिलांना आरोग्यासंदर्भात आधार देणे आणि मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध योजना आखलेल्या आहेत. लाखो महिला त्याचा लाभ घेत आहेत. ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त गोव्यातील महिलांसाठी हा निर्णय मोठा देणारा ठरला आहे. कारण इतके महागडे उपचार सर्वसामान्य कुटुंबातील महिला घेऊ शकत नाहीत. याशिवाय अशा अनेक सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
टाटा मेमोरियलमध्ये प्रशिक्षण
गोमेकॉचे स्वतंत्र कर्करोगाचे इस्पितळ येत्या १६ महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. ते म्हणाले की, हे इस्पितळ चालविण्यासाठी मुंबई येथील टाटा मेमोरियल इस्पितळाशी करार करण्यात आला आहे. गोमेकॉतील काही नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी टाटा मेमोरियलमध्ये पाठविण्यात आले आहे. आणखी कर्मचाऱ्यांना तिथे प्रशिक्षणासाठी तिथे पाठविले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
डिजिटल रजिस्ट्री
सद्यस्थितीत कर्करोगासंबंधीची अद्ययावत रजिस्ट्री तयार नाही. परंतु डिजिटल रजिस्ट्रीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ती लवकरच पूर्ण केली जाईल. डायबिटीसच्या रुग्णांची डिजिटल रजिस्ट्री करण्याचे कामही सुरू करण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
टार्गेटेड सेल थेरपी
कर्करुग्णाला रेडिओ थेरपी व किमोथेरपी दिली जाते. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशींबरोबरच इतर पेशीही नष्ट होतात. त्याचा रुग्णाला त्रास होतो. त्यामुळे केवळ कॅन्सरच्या पेशींनाच लक्ष्य करणारी टार्गेटेड थेरपी देण्याचा गोमेकॉचा प्रत्न सुरू असल्याचीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.