ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंटचे उमेदवार जाहीर
By समीर नाईक | Published: March 31, 2024 03:55 PM2024-03-31T15:55:44+5:302024-03-31T15:55:55+5:30
अधिसूचनेनुसार ताळगाव पंचायत चार प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
पणजी: ताळगाव पंचायतची निवडणुका २८ एप्रिल रोजी होणार आहे. एकूण ११ प्रभागाचे प्रतिनिधी यावेळी निवडून येणार आहे. हल्लीच पंचायत खात्यातर्फे याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर बाबुश मोंसेरात आणि ताळगावच्या आमदार तथा जेनिफर मोंसेरात यांनी आपला पॅनल जाहीर केले आहे.
अधिसूचनेनुसार ताळगाव पंचायत चार प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. एक प्रभाग ओबीसीसाठी आणि प्रभाग क्रमांक ५ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या नुसार मोंसेरात कुटुंबियांकडून ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंट नावाने आपले पॅनल जाहीर केले आहे.
ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंटमध्ये प्रभाग क्र. १ मधून सिद्धी केरकर (ओबिसी), प्रभाग क्र. २ मधून आग्नेलो डिकुन्हा, प्रभाग क्र. ३ मधून हेलेना परेरा (महिला), प्रभाग क्र. ४ मधून रतिका रवींद्र गावस (महिला), प्रभाग क्र. ५ मधून उषांत काणकोणकर (एसटी), प्रभाग क्र. ६ मधून एस्टेला डिसोझा (महिला), प्रभाग क्र. ७ मधून जानू रोझारियो, प्रभाग क्र. ८ मधून मारिया फर्नांडीस, प्रभाग क्र. ९ मधून संजना दिवकर (महिला), प्रभाग क्र. १० मधून सागर बांदेकर, आणि प्रभाग क्र. ११ मधून सिडनी बरॅटो यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ताळगाव गावाचे मूळ वैभव राखून ठेवून एका आदर्श गावास साजेसा विकास करून तो कायम राखला आहे आणि त्यामुळे प्रत्येक ताळगावकराला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. ताळगाव कम्युनिटी सेंटर, कचरा संकलन सुविधा, चिल्ड्रन्स पार्क, बॅडमिंटन कोर्ट आणि उद्याने अशा विविधांगी साधनसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही संघटीतपणे काम केले आहे. यापुढे असेच काम आम्ही सुरू ठेवणार आहोत, असे जेनिफर मोंसेरात यांनी यावेळी सांगितले.