लोकसभेवेळी मगोप उमेदवार उभा करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2017 02:40 AM2017-07-09T02:40:45+5:302017-07-09T02:41:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यसभा खासदार पदासाठीच्या निवडणुकीत तसेच पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : राज्यसभा खासदार पदासाठीच्या निवडणुकीत तसेच पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपशकुन करायचा नाही, असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ठरवले आहे; मात्र २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार दोन्ही मतदारसंघांत उभा केला जाईल, असे सांगत भाजपने आपल्याला गृहीत धरू नये, असा इशारा पक्षाने दिला आहे.
पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक झाल्यानंतर त्या बैठकीत घेतलेल्या ठरावांची माहिती अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शनिवारी दिली. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असा ठराव या बैठकीत मांडून संमत करण्यात आला. पणजी व वाळपई विधानसभा मतदारसंघातून मगोप पोटनिवडणूक लढवणार नाही; कारण आम्हाला सरकारचे स्थैर्य महत्त्वाचे आहे, असे ढवळीकर यांनी नमूद केले. मात्र, २०१९ साली लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही आमचे उमेदवार उभे करू; कारण आम्हाला मतांचे प्रमाण वाढवायचे आहे, असे ते म्हणाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी मगोपला साडेअकरा टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीवेळी हे प्रमाण आम्हाला २0 टक्क्यांपर्यंत न्यायचे असून त्यासाठी आम्ही आतापासूनच तयारी सुरू करण्याचा ठराव घेतला आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
जर यापुढे कोणत्याही पक्षाच्या विद्यमान आमदाराने राजीनामा दिला व त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली, तर त्या जागेवर मात्र मगो पक्ष दावा करील, असेही ढवळीकर म्हणाले. गोमांस खाणाऱ्याला जाहीरपणे फाशी द्यायला हवी, अशी मागणी साध्वी सरस्वती यांनी केल्याबाबत काय वाटते, असे पत्रकारांनी विचारले असता, साध्वी सरस्वती यांनी जे काही विधान केले, त्याच्याशी राजकीय पक्षांचा संबंध येत नाही, असे ढवळीकर म्हणाले. साध्वी सरस्वती ज्या संघटनेचे प्रतिनिधित्व करतात, त्या संघटनेच्या विचारांचा त्या प्रसार करत असाव्यात. आम्हाला त्यांच्या विधानांशी देणेघेणे नाही. राजकीय पक्ष हे राज्यघटनेनुसार चालत असतात, असेही ढवळीकर म्हणाले.