गोव्यात खवळलेल्या समुद्रात होडी बुडाली, एक खलाशी बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 05:27 PM2019-10-24T17:27:17+5:302019-10-24T17:27:51+5:30
सुमारे 26 होड्या मासेमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी 25 होड्या जेटीवर पोहोचल्या.
मडगाव - गोव्यात खवळलेल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या होडीपैकी एक होडी गुरुवारी बेतूल येथे साळ नदीच्या मुखावर वाळूच्या पट्टय़ांना आपटून फुटल्याने होडीचा तांडेल बेपत्ता झाला आहे. चार खलाशांना स्थानिक मच्छीमारांनी काठावर आणले. सध्या बेपत्ता तांडेलाचा शोध घेणे चालू असून तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर त्याचा शोध घेत आहे.
गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. सकाळी 9 च्या सुमारास मासेमारी करुन होड्या तडीकडे परतत असताना ही दुर्घटना घडली. सुमारे 26 होड्या मासेमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी 25 होड्या जेटीवर पोहोचल्या. मात्र एक होडी साळ नदीच्या मुखावरील वाळूच्या पट्टय़ात अडकून पडली. त्यामुळे होडी कलल्याने आतील पाचही खलाशी पाण्यात फेकले गेले.
स्थानिक मच्छीमार जिजस डिकॉस्ता याने खलाशी बुडत असल्याचे पाहिल्यावर आपल्या अन्य साथीदारांना घेऊन जेटस्कीच्या सहाय्याने त्यांना गाठले. बुडणाऱ्या चारजणांना जिजस याच्याबरोबर मायकल व विष्णू जुवेकर या तिघांनी काठावर आणले. मात्र पाण्याच्या लाटात होडीचा तांडेल वाहून गेल्याने तो बेपत्ता झाला. लाटांच्या तडाख्याने होडी फुटून गेली अशी माहिती स्थानिकांनी दिली. या दुर्घटनेची खबर त्वरित तटरक्षक दलाला दिल्यानंतर त्वरित हेलिकॉप्टरद्वारे बेपत्ता खलाशाचा शोध घेण्याचे काम चालू झाले. मात्र दुपारपर्यंत त्याचा पत्ता लागू शकला नाही. समुद्रात वादळीपट्टा तयार झाल्याने संपूर्ण समुद्र खवळलेला असताना या होडय़ा मासेमारीसाठी गेल्या होत्या. हवामान खात्याने त्यापूर्वी खबरदारीचा इशाराही दिला होता.