तिघांना जलसमाधी! माय-लेकराचा मृतदेह सापडला; आईच्या मिठीत होते लेकरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:33 AM2023-08-01T09:33:07+5:302023-08-01T09:35:10+5:30
तारीपाटो-सांगे येथील नदीत कार बुडाली, तीन तासांहून अधिक कॉळ शोधमोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क सांगे : तारीपाटो- सांगे येथील नदीत सोमवारी कार कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा बुडुन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीतून कार बाहेर काढली असता आई व मुलगा मृतावस्थेत सापडले तर पती मिलिंद नाईक (वय ३८) यांचा शोध सुरू आहे. रेखा यादव (वय ३५) व दिव्यांश नाईक (२ वर्ष), अशी मृतांची नावे आहेत.
सांगे पोलिस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किणामळ सांगे येथील मिलिंद नाईक हे आपल्या पत्नी व दोन वर्षांच्या मुलासह जीए ०१ आर ९१५८ कारने सांगेच्या दिशेने जात होते. तारीपाटो येथील पुलावरून जात असताना पुलावरील खोलगट भागाचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट नदीत कोसळली. नदी पात्रात काहीतरी कोसळल्याचा आवाज स्थानिकांना आल्यानंतर त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.
वाहनाच्या लाईट्स सुरू असल्यामुळे लोकांना पात्रात वाहन पडल्याचे दिसून आले. स्थानिकांनी तातडीने सांगे पोलिस व अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यावर पोलिस व अग्निशमनचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने युध्दपातळीवर बचावकार्य सुरू झाले. पुलाच्या उतरणीवरून जात असताना ही घटना घडली. पुलाला संरक्षक कठडे असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी चर्चा सुरू होती.
दरम्यान, तीन तासांनंतर नदी पात्रात पडलेल्या कारचा शोध लागला. त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी ही कार बाहेर काढली असता कारमध्ये माय-लेकराचा मृतदेह सापडला. तर पती मिलिंद यांचा शोध सुरू आहे.
आईच्या मिठीत होते लेकरु
तारीपाटो नदी पात्रात बुडालेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमके कितीजण बुडालेत? कोणाची कार? "अशी चर्चा सुरू होती. त्याचवेळी पात्रात कारचा सुगावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी का माय-लेकराचा मृतदेह दिसून आला. आपल्या आईच्या कुशीत बसून प्रवास करणाऱ्या दोन वर्षांचा दिव्यांश तिच्याच मिठीत निपचीत पडला होता. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
मुलीचा हंबरडा अन् वडिलांचा शोध सुरु
कार नदीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक जमू लागले, नदी पात्रातून कार बाहेर काढल्यानंतर आई व मुलाचा मृतदेह कारमधून काढून सांगे इस्पितळात नेण्यात आला. त्यावेळी मिलिंद नाईक यांच्या मुलीने मृतदेह पाहून हंबरडा फोडला. तसेच आईला कार चालवता येत नव्हती, बाबाही सोबत होते. ते कुठे आहेत असे म्हणून ती रडू लागल्यानंतर मिलिंद नाईक यांचा शोध सुरु झाला.