बँण्ड शो वरून परतणाऱ्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 04:45 PM2018-12-30T16:45:33+5:302018-12-30T16:57:02+5:30
नाताळ व नववर्षानिमित्त सध्या गोव्यात संगीत रजनीचे कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरे केले जात आहेत. राज्यातील उत्तर गोवा जिल्हयातील आर्पोरा येथे बँण्ड शोचा कार्यक्रम आटपून घरी परत जात असताना कारने एका झाडाला धडक दिल्याने कारचालकचा मृत्यू झाला.
मडगाव - नाताळ व नववर्षानिमित्त सध्या गोव्यात संगीत रजनीचे कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरे केले जात आहेत. राज्यातील उत्तर गोवा जिल्हयातील आर्पोरा येथे बँण्ड शोचा कार्यक्रम आटपून घरी परत जात असताना कारने एका झाडाला धडक दिल्याने कारचालकचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. दक्षिण गोव्यातील मडगाव येथील घोगळ या उपनगरीय भागात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अपघाताची घटना घडली. ब्रायज फर्नाडीस (21) असे मृत चालकाचे नाव असून तो कोलवा येथील रहिवाशी आहे. जोश्वा वाझ (18) रा. रावणफोंड, क्लिटंन मार्टीन्स (25) रा. वार्का व न्युसेन पेरेरा (20) रा. कोलवा अशी जखमींची नावे आहेत.
जखमींपैकी जोश्वा वाझ व क्लिटंन मार्टीन्स यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या रुग्णालयात तर न्युसेन पेरेरा याच्यावर मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात उपचार चालू आहे. जखमीपैंकी दोन जण म्युझिशियन असल्याची माहितीही फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक फ्रान्सिस ङोवियर यांनी दिली. रात्री आर्पोरा येथे बँण्ड शो होता. हा शो आटपून कारमधून चार जण मडगावला आले होते. जोश्वा हा रावणफोंड येथे रहात असल्याने त्याला घरी पोहचविण्यासाठी पुर्वबगल मार्ग रस्त्यातून जात असताना कारने एका झाडाला धडक दिली. अपघात घडला तेव्हा तेथून एक इसम जात होता. त्याने त्वरीत फातोर्डा पोलिसांना अपघातविषयी माहिती दिली.
फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फ्रान्सिस ङोवियर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना सुरुवातीला मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात दाखल केले. तेथे ब्रायज फर्नाडीस याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जोश्वा व क्लिंटनची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. भारतीय दंड संहितेच्या 279, 338 व 304 (अ) कलमाखाली पोलिसांनी वरील अपघात प्रकरणांची नोंद केली आहे. मृत चालक ब्रायज फर्नांडीस याच्यावर या अपघातप्रकरणी गुन्हा नोंदविला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.