भरधाव कारने १६ दुचाकींना ठोकरले; युवक गंभीर
By admin | Published: March 4, 2015 01:56 AM2015-03-04T01:56:35+5:302015-03-04T01:56:50+5:30
पणजी : पणजी बसस्थानकाजवळ फोर्ड एन्डेवर कार चालकाचा वाहनावरील ताबा गेल्यामुळे त्याने १६ वाहनांना ठोकर दिली.
पणजी : पणजी बसस्थानकाजवळ फोर्ड एन्डेवर कार चालकाचा वाहनावरील ताबा गेल्यामुळे त्याने १६ वाहनांना ठोकर दिली. या अपघातात योगेश हेदे हा दुचाकीचालक गंभीररीत्या जखमी झाला आहे.
हा अपघात संध्याकाळी ३ वाजता येथील क्रांती सर्कलजवळ झाला. म्हापसा दिशेहून येणाऱ्या कारने क्रांती सर्कलच्या बाजूने वळण घेतल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा गेला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकींना त्याने ठोकर दिली. एक दुचाकीस्वार रस्त्यावर आपटल्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाली. त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. दुसरा दुचाकीचालक लॉयल फर्नांडिस हा किरकोळ जखमी झाला आहे.
गाडीवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नातच कार बाजूला असलेल्या पार्किंग जागेत घुसली. तेथील दुचाक्यांना ठोकर देत ती पुढे गेली. थेट गाडीची टक्कर बसलेल्या आणि एकावर एक आपटून अशा एकूण १४ दुचाक्या खाली पडल्या. काही दुचाक्यांचे मोठे, तर काहींचे किरकोळ नुकसान झाले आहे.
वाहनाचा वेग फार असल्यामुळेच चालक सागर वडारकर याचा त्यावरील ताबा गेला. दोन मोटरसायकलना ठोकर दिल्यावर ती डावीकडे वळविण्याच्या प्रयत्नात त्याने त्या ठिकाणी असलेल्या बॅरेकेट्सवर घातली. त्यानंतर बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेल्या मोटरसायकल तुडवीत ती पुढे गेली.
या प्रकरणात चालकाला अटक करण्यात आली आहे. निष्काळजीपणे वाहन हाकलल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम २७९, ३३७ आणि ३३८ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
(प्रतिनिधी)