गोव्यात कार्निव्हल २ मार्चपासून, पणजीतील मिरवणूक मिरामार-दोनापॉल मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 08:14 PM2019-01-24T20:14:09+5:302019-01-24T20:20:02+5:30
गोव्यात २ मार्चपासून कार्निव्हल साजरा केला जाणार असून ‘खा, प्या आणि मजा करा’ हा संदेश देत ‘किंग मोमो’ची राजवट सुरु होणार आहे. राजधानी शहरात याच दिवशी मिरवणुकीचे आयोजन आहे.
पणजी - गोव्यात २ मार्चपासून कार्निव्हल साजरा केला जाणार असून ‘खा, प्या आणि मजा करा’ हा संदेश देत ‘किंग मोमो’ची राजवट सुरु होणार आहे. राजधानी शहरात याच दिवशी मिरवणुकीचे आयोजन आहे.
कार्निव्हल उपसमितीचे चेअरमन तथा महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मिरामार ते दोनापॉल अशीच ही चित्ररथ मिरवणूक होणार असून त्यासाठी २६ लाख रुपये खर्चाची तरतूद पर्यटन खात्याने केली आहे. यात बक्षिसांच्या रकमेचाही समावेश आहे. याशिवाय येथील मेरी इमेक्युलेट चर्चसमोरील उद्यानात सांबा स्क्वेअरमध्ये चार दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे. यंदा प्रथमच महापालिके च्या काही निवडक प्रभागांमध्ये तियात्रही होतील.
खजिनदार मिनीन डिक्रुझ यांनी अशी माहिती दिली की, कार्निव्हल केवळ शहराच्या प्रमुख भागापुरताच मर्यादित राहू नये अशी नागरिकांची भावना आहे त्यामुळे दोनापॉल, करंजाळे, रायबंदर भागात तियात्र खेळांचे तसेच संगीत कार्यक्रमांचे आयोजन आहे. कार्निव्हल मिरवणुकीच्या निमित्ताने पर्यटकही आकर्षित व्हावेत यासाठी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा मंडप उभारुन हॉटेलांना ही जागा काही शुल्क आकारुन उपलब्ध केली जाईल.
उपसमितीच्या प्रेसिंडेंट म्हणून तिमोतिन फर्नांडिस यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी ही मिरवणूक दोनापॉलहून सुरु केली जावी, असे सूचविले आहे. प्रत्येकी एक किलोमिटरचे तीन विभागही त्यांनी सूचित केले आहेत. पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक उदय मडकईकर हेही उपस्थित होते.