गोव्यात उद्यापासून कार्निव्हल, ५४ लाख ७० हजारांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 12:51 PM2021-02-12T12:51:43+5:302021-02-12T12:52:45+5:30
Carnival in Goa : कार्निव्हलचे मोठे आकर्षण देशभरातील पर्यटकांना आहे. त्यामुळेच पणजी व मडगाव अशा दोन ठिकाणी यावेळी आम्ही कार्निव्हल आयोजित करत असल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
पणजी - राज्यात उद्या शनिवारपासून कार्निव्हलला आरंभ होत आहे. यावेळी कोविडमुळे फक्त पणजी व मडगाव शहरातच कार्निव्हल होणार आहे. बक्षिसे व साधनसुविधा मिळून कार्निव्हलवर एकूण ५४ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. कांदोळी येथील अेरिक डायस हे यावेळी किंग मोमोच्या भूमिकेत आहेत. कोविड एसओपीचे पालन करूनच कार्निव्हल साजरा केला जाईल, असे पर्यटन खात्याने शुक्रवारी येथे जाहीर
केले. (Carnival in Goa)
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी किंग मोमो डायस याच्यासोबत येथे पत्रकार परिषद घेतली. जर आम्ही कार्निव्हल व शिगमोत्सव साजरा केला नाही तर पर्यटन उद्योग क्षेत्रात गोवा राज्य मागे पडेल. केरळ व अन्य राज्ये पुढे जातील. कार्निव्हलचे मोठे आकर्षण देशभरातील पर्यटकांना आहे. त्यामुळेच पणजी व मडगाव अशा दोन ठिकाणी यावेळी आम्ही कार्निव्हल आयोजित करत असल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
विमान तिकीट तिप्पट
दोन दिवस अगोदरच गोव्यात पर्यटक येऊन थांबलेले आहेत. पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. विमान प्रवासाचे तिकीट भाडे तीनपट वाढलेले आहे. तरी देखील पर्यटक गोव्यात येत आहेत. अशावेळी आम्ही कार्निव्हल आयोजित करायलाच हवा. फक्त प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टनसींग पाळावे एवढे कार्निव्हलवेळी अपेक्षित आहे, असे आजगावकर म्हणाले.
गोव्यात तीन दिवस किंग मोमोची राजवट असेल. लोकांनी कार्निव्हलचा आनंद लुटावा. कार्निव्हल व शिगमो हे दोन्हीही राज्य उत्सव आहेत. एरव्ही सात ठिकाणी कार्निव्हल होत होता. आम्ही यावेळी दोनच ठिकाणी कार्निव्हल करत आहोत, असे आजगावकर म्हणाले. ३१ चित्ररथांची नोंदणी झालेली आहे. यावरूनही कार्निव्हलचा प्रतिसाद कळून येतो. बक्षिसांवर सात लाख रुपये खर्च केले जातील. त्या शिवाय कार्निव्हलसाठी साधनसुविधांवर खर्च केला जाईल, असे आजगावकर म्हणाले.
गोवा माईल्सचे समर्थन
दरम्यान, गोवा माईल्स ही अेपआधारित पर्यटक टेक्सी सेवा आपण गोव्यात सुरू केली, असे आजगावकर यांनी सांगितले. गोव्यातील अवघ्येच टेक्सी व्यवसायिक ज्यादा भाडे पर्यटकांकडून आकारतात अशा प्रकारची तक्रार येऊ लागली. त्यामुळे गोवा माईल्सला गोव्यात येण्याची संधी मिळाली. जर गोव्यातील टेक्सी व्यवसायिकांनी अगोदरच मीटर पद्धत स्वीकारली असती तर गोवा माईल्सला संधीच मिळाली नसती, असे आजगावकर म्हणाले. आता गोवा माईल्स किंवा अन्य विषयाबाबत काय निर्णय घ्यावा ते वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो ठरवतील, असे आजगावकर म्हणाले.