रुग्ण शुल्क प्रकरणी मंत्री केसरकर, सिंधुदुर्गातील भाजप शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 03:58 PM2017-11-04T15:58:47+5:302017-11-04T15:59:04+5:30
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच राजापुर रत्नागिरी आदी भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांना 1 डिसेंबरपासून शुल्क लागू होणार आहे.
पणजी - गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात परप्रांतीय रुग्णांना येत्या महिन्यापासून शुल्क लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शेजारी महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा तसेच गोमेकॉ चे डीन प्रदीप नाईक यांची भेट घेतली. दुसरीकडे सिंधुदुर्ग भाजप शिष्टमंडळाने प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना निवेदन सादर करून या निर्णयावर फेरविचाराची मागणी केली आहे.
शेजारी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच राजापुर रत्नागिरी आदी भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांना 1 डिसेंबरपासून शुल्क लागू होणार आहे. तूर्त गोमेकॉत बाह्यरुग्ण विभागात तपासणी करून घेण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या वेगळ्या रांगा करण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग,कारवार भागात उपचारांची सोय नसल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण गोमेकॉत येत असतात. या रुग्णाचा अतिरिक्त भार गोवा सरकारला सहन करावा लागत असल्याने नवे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी एक डिसेंबरपासून शुल्क लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचे पडसाद शेजारी सिंधुदुर्गात उमटले.
लोकमत च्या या प्रतिनिधीने मंत्री केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या शुल्काचा परतावा देण्याची व्यवस्था करण्यात येणार असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. कालांतराने सिंधुदुर्गातील कोणी रुग्ण उपचारासाठी गोमेकॉत आल्यास खर्चाचा पूर्ण परतावा मिळणार आह. या योजनेचे नामांतर आता महात्मा फुले आरोग्यदायी योजना असे करण्यात येणार आहे. ही योजना मार्गी लागेपर्यंत सिंधुदुर्गातील रुग्णांना शुल्क आकारले नये अशी मागणी केसरकर यांनी केली आहे.
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, पक्षाचे राज्य सरचिटणीस राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीच्या उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, अतुल काळसेकर, बांद्याचे सरपंच मंदार कल्याणकर तालुकाध्यक्ष महेश सारंग, मंगेश तळवणेकर, दादू कविटकर, आनंद तेली, राजू राऊळ आदींनी मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतली. सिंधुदुर्गातून गोमेकॉत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वरील निर्णयाचा त्रास होणार आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. परप्रांतीय रुग्णांच्या वेगळ्या रांगा लावल्याने गैरसमज निर्माण झाल्याचे निदर्शनास आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी आरोग्यदायी योजनेत लाभ सिंधुदुर्गातील रुग्णांना गोमेद होते ही मिळावा जेणेकरून त्यांना शुल्काचा परतावा मिळेल, असे मत जठार यांनी व्यक्त केले.