डिचोली शांतादुर्गा विद्यालयातून रोख रक्कम, कॅमेरा व मोबाईल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 07:12 PM2023-12-29T19:12:47+5:302023-12-29T19:13:04+5:30
चोरट्यांकडून शाळा टार्गेट.
विशांत वझे, डिचोली : डिचोलीतील हमरस्त्यालगत असलेल्या श्री शांतादुर्गा विद्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश करत कपाटे उघडून अंदाजे बारा ते पंधरा हजार रुपये रोख, एक मोबाईल व एक कॅमेरा लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
काही दिवसांपूर्वी कुडणे येथील एका हायस्कूलमध्ये अशीच चोरी करून ७० हजार रोख लंपास करण्याची घटना घडली होती. नाताळनिमित्त शाळांना सुट्ट्या असल्याने चोरट्यांनी हायस्कूलमध्ये चोरी करण्याचे सत्र चालविले आहे. अनेक विद्यालयात दहावी परिक्षेचे शुल्क गोळा केलेली असून इंटरनेट चालत नसल्याने पैसे शाळेत ठेवण्यात आले आहेत. याच पैशांवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने चोरीच्या घटना घडत आहेत.
चोरी प्रकरणी मुख्याध्यापिका ऍडना रॉड्रिग्ज यांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनीही पाहणी केली. विद्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोघेजण कैद झाले आहेत. चोरटे कार्यालयातील कपाटे उघडून पडताळणी करतानाही कॅमेऱ्यात टीपले गेले आहेत.
संस्थेचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अंदाजे पंधरा हजार रोख तसेच कॅमेरा व मोबाईल चोरट्यांनी लंपास केला आहे. डिचोली पोलिस तपास करत आहेत.
शाळांनी सावधान राहवे..
चोरट्यांनी शाळांना लक्ष केल्याने शाळा व्यवस्थापनाने काळजी घेण्याचे तसेच रोख रक्कम शाळेत ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. डिचोली तालुक्यात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अशी वाढती मागणी आहे.
दरम्यान, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोलीतील चोरी प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.