कॅसिनो बंद करता येणार नाही, तो पर्यटनाचाच भाग - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 06:23 PM2019-06-11T18:23:45+5:302019-06-11T18:24:37+5:30
कॅसिनो गोव्याच्या पर्यटन व्यवसाय क्षेत्राचाच भाग आहे.
पणजी : कॅसिनो अनेक वर्षे गोव्यात आहेत. कॅसिनो गोव्याच्या पर्यटन व्यवसाय क्षेत्राचाच भाग आहे. आम्ही त्यांना पूर्ण बंद करू शकत नाही किंवा पूर्णपणे त्यांना हटवू शकत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे सांगितले.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने गोव्याच्या पर्यटनाला जगभर प्रोत्साहन देण्यासाठी एक व्हीडीओ तयार केला आहे. त्यात कॅसिनोही दाखविले गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तो व्हिडीओ मंगळवारी प्रथमच पाहिला. पत्रकारांनी त्याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, ते म्हणाले की राज्यात काही पर्यटक हे कॅसिनो उद्योगासाठीही येतात. कॅसिनोंचे काही पर्यटकांना आकर्षण आहे.
गोव्यात येणारे पर्यटक हे केवळ ठराविक एकाच कारणास्तव येतात असे नाही. राज्याची अर्थव्यवस्था सुस्थितीत राहण्यासाठी व कारभार चालण्यासाठी काही गोष्टी हव्या असतात. कॅसिनो अनेक वर्षे आहेत व ते पूर्णपणो हटविता येणार नाहीत. सध्या तरी कॅसिनो हे गोव्याच्या पर्यटनाचे एक अंग होऊन राहिले आहेत. आम्ही ते पूर्णपणे हटवणार किंवा बंद करणार असे कधीच म्हटलेले नाही.
मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही सांस्कृतिक आणि वैद्यकीय पर्यटनालाही गोव्यात प्रोत्साहन देणार आहोत. तसेच ग्रामीण भागातही पर्यटन वाढवा असे मी पर्यटन खात्याला व पर्यटन विकास महामंडळाला सांगितले आहे. मंगळवारी मी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. बोंडला, महावीर व अन्य अभयारण्ये आणि सत्तरीतील सुर्लासारख्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी पर्यटन खात्याच्या भागिदारीने पर्यटन महामंडळाने काम करावे. बोंडलाकडे दुर्लक्ष झाले आहे.
पणजीहून पर्यटकांना बोटद्वारे बोंडलाला कसे नेता येईल याविषयीही विचार करावा. त्यासाठी जलसंसाधन खात्याची मदत घ्यावी. मर्यादित प्रमाणात वन क्षेत्रत पर्यटनाचा विस्तार व्हायला हवा. नव्या जागा शोधून काढायला हव्यात. पर्यटन महामंडळाचे नवे चेअरमन त्याकडे निश्चितच लक्ष देतील.