मांडवीतील कॅसिनोंना आणखी सहा महिने मुदतवाढ, पर्यायी जागा सापडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 07:05 PM2019-09-25T19:05:40+5:302019-09-25T19:05:57+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.
पणजी : मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांना आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दि. 31 मार्च 2020 र्पयत तरी सर्व सहाही कॅसिनो जहाजे मांडवी नदीतच राहतील हे स्पष्ट झाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. मांडवी नदीच्या मुखावर तसेच शापारो, जुवारी या नद्यांच्या पात्रत आणि आग्वाद येथे सरकारने कॅसिनोंसाठी पर्यायी जागा शोधली होती. मात्र तिथे कॅसिनो नेऊन ठेवण्यासाठी आक्षेप आल्याने आपण काही करू शकत नाही व मांडवी नदीतच पुढील सहा महिने कॅसिनो ठेवण्यास मुदतवाढ द्यावी लागते अशी भूमिका मंत्रिमंडळाने घेतली.
मांडवी नदीत कॅसिनो जहाजांना राहण्यासाठी दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देण्याची पद्धत र्पीकर सरकार अधिकारावर असताना सुरू केली गेली होती. ही पद्धत सावंत सरकारनेही कायम ठेवली अहे. मांडवी नदीतील कॅसिनोंची मुदत येत्या दि. 30 सप्टेंबरला संपणार आहे. आता मुदतवाढ दिल्याने दि. 1 ऑक्टोबर 2019 ते दि. 31 मार्च 2020 पर्यंत तरी कॅसिनो जहाजे मांडवीतच राहतील. बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांच्या मते एक कॅसिनो जहाज आग्वाद येथे जाण्यास तयार झालेले आहे. त्याविषयी चर्चा सुरू आहे. एकदा निर्णय होताच एक जहाज तरी आग्वादला जाईल.
दरम्यान, दर सहा महिन्यांनी आम्ही मुदतवाढ देण्याचा खेळ खेळण्याऐवजी एकदाच काय तो ठाम निर्णय आपण घेऊया, जर मांडवीत आहे तिथेच जहाजे रहावीत असे वाटत असेल तर आम्ही तशीच स्पष्ट भूमिका घेऊया, असा सूर काही मंत्र्यांनी बैठकीत व्यक्त केला. गोमंतकीयांना कॅसिनोवर जाण्यास पूर्ण बंदी लागू केली की वाद संपेल असेही काही मंत्री म्हणाले. मिलिंद नाईक व विश्वजित राणो हे दोन मंत्री बैठकीला उपस्थित नव्हते.
मांडवीतील कॅसिनो जहाजांविषयी काय करायचे याचा धोरणात्मक निर्णय आम्ही येत्या सहा महिन्यांत घेऊ. तूर्त सहा महिने तरी, ही जहाजे मांडवीतच राहतील.
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत
कॅसिनो कंपनी..............जहाजाचे नाव.....परवाना मुदत संपण्याचा कालावधी
1) डेल्टा कॉर्प...........एम. व्ही. हॉर्सश्यू...........ऑगस्ट 2018 (नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे)
...................................................................................
2) गोवा कोस्टर रिसॉर्ट्स.....एम. व्ही. प्राईड.........12 सप्टेंबर 2023
.............................................................................
3) हायस्ट्रीट क्रुजीस........एम. व्ही. कॅसिनो रॉयल......23 ऑक्टोबर 2023
....................................................................
4) गोल्डन पीस इन्फ्रा.......एम. व्ही. आर्गोसी........3 डिसेंबर 2023
...............................................................................................
5) डेल्टा प्लेजर........एम. व्ही. रॉयल फ्लोटेल......2 डिसेंबर 2019
..................................................................................................
6) गोल्डन ग्लोब........एम. व्ही. लकी सेवन........21 जानेवारी 2023