फेलिक्स दहाल मृत्यू प्रकरणाचा सीबीआयकडून पुन्हा तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 04:45 PM2020-01-25T16:45:45+5:302020-01-25T16:47:18+5:30
एम्सच्या डॉक्टराकडून घटनास्थळाची पहाणी: अपघात की खून याबददल शाशंकता
मडगाव: पाच वर्षापूर्वी गोव्यात आला असताना संशयास्पदरित्या मरण पावलेल्या फिनीश तरुण फेलिक्स दहाल (२२) याच्या मृत्यूच्या प्रकरणाची बंद झालेली फाईल सीबीआयने पुन्हा खुली केली आहे. या तरुणाचा मृत्यू कसा झाला असावा याचा अंदाज घेण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाने बुधवारी घटनास्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली.
२८ जानेवारी २0१५ रोजी काणकोण येथे फिनीश तरुणाचा मृत्यू आला होता. मद्यधुंद अवस्थेत असताना रस्त्यावर कोसळल्याने त्याचा मृत्यू आला असावा असा प्राथमिक संशय स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती. पण फेलिक्सची आई मीना फिरहॉनन यांनी न्यायालयात हे प्रकरण लावून धरल्यानंतर खून म्हणून हे प्रकरण नोंद करुन पुन्हा तपास करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र तसा तपास करुनही पोलिसांच्या हाती कसलाच पुरावा न लागल्याने या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. पण फेलिक्सच्या आईच्या मागणीवरुन या प्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला.
हा मृत्यू कसा झाला असावा याचा तपास करण्यासाठी सीबीआयने एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला मागितला असून त्यानुसार एम्सच्या न्यायवैद्यक विभागातील तीन डॉक्टरांच्या पथकाने ज्या ठिकाणी फेलिक्सचा मृत्यू झाला होता, त्या भागाची पाहणी केली. येत्या दोन महिन्यात हे पथक आपला अहवाल देणार आहे.
या प्रकरणात मडगावच्या हॉस्पिसियो रुग्णालयात शवविच्छेदन झाले होते. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयच्या विनंतीवरुन दिल्लीतील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील तज्ञांनी मागच्या वर्षी घटनास्थळाला भेट देऊन हा मृत्यू कसा झाला असावा याची प्रात्यक्षिकाद्वारे पाहणी केली होती. हा मृत्यू अपघाती की खून या संदर्भात ही संस्था आपला अहवाल देणार असून या अहवालाची आम्ही वाट पहातो असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
सीबीआयच्या चौकशीप्रमाणे मृत्यूपूर्वी फेलिक्सला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला. फेलिक्सच्या आईनेही पैशाच्या वादातून दोघा तरुणांकडून आपल्या मुलाला मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असा आरोप केला होता.