सर्व पोलीस स्थानकांतील कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Published: September 17, 2014 01:16 AM2014-09-17T01:16:34+5:302014-09-17T01:27:56+5:30
पणजी : राज्यातील सर्व पोलीस स्थानकांतील कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या कोठड्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येणार आहेत. कैद्यांच्या हालचाली त्यातून टिपल्या जाणार आहेत.
पणजी : राज्यातील सर्व पोलीस स्थानकांतील कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या कोठड्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येणार आहेत. कैद्यांच्या हालचाली त्यातून टिपल्या जाणार आहेत.
पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी ही माहिती दिली. राज्यातील सर्व २८ पोलीस स्थानकांत ही व्यवस्था करण्यात येणार आहे. एका पोलीस स्थानकात किमान ४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ड्युटी आॅफिसर व कैदखाना यात प्रामुख्याने ते लावण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या इतर दोन ठिकाणी ते लावण्यात येणार आहेत, अशी माहिती गर्ग यांनी दिली.
असा प्रयोग दिल्ली व इतर राज्यांत करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी सिद्ध झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची संख्या वाढत आहे. गोव्यातही त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होऊ शकेल, असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला.
गर्ग यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील पोलीस स्थानकांचा दौरा सुरू केला होता. मंगळवारी डिचोली, वाळपई येथील पोलीस स्थानके व पोलीस प्रशिक्षण केंद्राला त्यांनी भेट दिली. या भेटीने त्यांचा उत्तर गोव्यातील पोलीस स्थानकांचा दौरा पूर्ण झाला आहे. बुधवारपासून ते दक्षिण गोव्यातील पोलीस स्थानकांचा दौरा करणार आहेत.