‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 09:51 PM2017-09-07T21:51:15+5:302017-09-07T22:04:47+5:30

लोकमत ‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा गुरुवारी पार पडला. उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या वातावरणात तब्बल तीन तास डोळ्यांचे पारणो फेडणारा हा कार्यक्रम झाला.

Celebration of 'Govan of the Year' award ceremony | ‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा संपन्न

‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा संपन्न

Next

पणजी, दि. 7 - लोकमत ‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा गुरुवारी पार पडला. उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या वातावरणात तब्बल तीन तास डोळ्यांचे पारणो फेडणारा हा कार्यक्रम झाला. नामांकने जाहीर होत होती तेव्हा पुरस्कार कोणाला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढत होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री  नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मनोहर उसगांवकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात व्यासपीठावर गडकरी व पर्रीकर यांच्यासह लोकमतच्या संपादकीय मंडळाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा उपस्थित होते. 
नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, महसूलमंत्री रोहन खंवटे, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर, आमदार निलेश काब्राल, आमदार कार्लुस आल्मेदा, आमदार रवी नाईक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन, उद्योगपती अवधूत ¨तबलो आदींनी उपस्थिती लावली.                                             
युवा राजकारणी, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला आणि संस्कृती, कृषी व सनदी अधिकारी अशा सात विभागांमध्ये प्रत्येकी तीन नामांकने जाहीर करुन वाचकांची मतें मागविली होती. युवा राजकारणी विभागात पर्वरीचे आमदार तथा महसूलमंत्री रोहन खंवटे, उद्योग विभागात ब्लेझ कोस्ताबिर, शिक्षण विभागात व्यंकटेश प्रभूदेसाई, साहित्य विभागात महाबळेश्वर सैल, कला आणि संस्कृती विभागात सुशांत तारी, कृषी विभागात अजित मळकर्णेकर तर सनदी अधिकारी विभागात प्रसाद लोलयेंकर यांना ‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला. 
लोकमतच्या संपादकीय मंडळाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केंद्राने आता गोव्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, असे आवाहन केले. गोव्याला खास दर्जा मिळाल्यास येथील उत्पन्नाचे स्रोत वाढतील, असे ते म्हणाले. लोकमत केवळ बातम्या देण्याचेच काम करीत नाही तर समाजातील प्रत्येक क्षेत्रात काम करुन व्यक्तिमत्त्वे घडविण्याचेही काम करते. महाराष्ट्रात युवक, महिला युवतींसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. तेथे लोकमत सखी मंचचे तीन लाख महिलांनी सदस्यत्त्व घेतले असून गोव्यातही त्याच दिशेने लोकमत वाटचाल करीत आहे.  दर्डा पुढे म्हणाले की, लोकमतच्या महाराष्ट्रात ११ आवृत्त्या असून २६ लाख वाचक आहेत. गोव्यात आधुनिक पध्दतीने पर्यटन वाढावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

                                                      मुंबई-गोवा बोटसेवा ऑक्टोबरपासून 
                                                 - काँक्रिट मार्गावर १८ हजार कोटी खर्च करणार 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘लोकमतने नेहमीच सुप्त गुणांना वाव दिला. अशा प्रकारचे गौरव सोहळे प्रोत्साहन देत असतात. लोकमतचा एक पुरस्कार मीदेखिल घेतलेला आहे आणि ते माङो सौभाग्य आहे. मुंबई-गोवा चौपदरी महामार्ग काँक्रिटिकरणाचे 18 हजार कोटी रुपये खर्चून केले जाणारे काम वेगात सुरु आहे. कशेडी घाटातील कामाच्या निविदा नुकत्याच काढलेल्या आहेत. गोव्यात 20 हजार कोटींची कामे मंजूर केली. या राज्याला मी भरभरुन दिले. गोव्याला आता खास दर्जाची गरज राहिलेली नाही. झुवारीवरील समांतर पूल टॉवरमुळे जगाचे आकर्षण ठरणार आहे. विमानतळावर उतरल्यानंतर थेट बोटीतून पर्यटकांनी हॉटेल गाठावे, अशी व्यवस्था गोव्यात केली जाणार आहे. मुंबई-गोवा बोटसेवा येत्या ऑक्टोबरअखेरपर्यंत सुरु होईल. गोव्यात मोठ्या जहाजांसाठी क्रुझ टर्मिनल होईरू त्यामुळे पर्यटक वाढतील. पर्यटन हीच गोव्याची श्रीमंती आहे. रोज येथे ८९ विमाने येतात. येथील निसर्ग मलाही हवाहवासा वाटतो. गोव्यात यापुढे सर्व वाहने इलेक्ट्रीकल तसेच जैव इंधनावर चालणारी असावीत जेणोकरुन येथे प्रदूषण होणार नाही.’
                                                            हा पुरस्कार गोव्याचा : पर्रीकर 
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना कर्तबगार लोकनेता म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पर्रीकर म्हणाले की, ‘ कोणीही जास्त स्तुती केली की मी अधिक सतर्क होतो. स्तुती डोक्यात चढू न देता स्वत:चे दोष शोधा, ’ हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून गोव्याचा आहे. 
                                                            अॅड. उसगांवकर यांचे गौरवाला उत्तर
जीवनगौरव पुरस्कारप्राप्त अॅड. उसगांवकर गौरवाला उत्तर देताना म्हणाले की ‘पोर्तुगीज कायदा अनुवादाच्या आपण केलेल्या कामाचा लाभ इतर राज्यांनाही व्हावा. पोर्तुगीजांच्या नागरी संहितेची (सिव्हिल कोड) देशातील अन्य राज्यांमध्येही अंमलबजावणी व्हावी. सेंटर फॉर इंडो-पोर्तुगीज रिलेशन्स या संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे पोर्तुगीज नागरी कायदा अनुवादाचे काम शक्य झाले. अनेकांना खटल्यांमध्येही ते उपयोगी पडले’उसगांवकर यांनी पोर्तुगीज नागरी कायदा इंग्रजीत आणण्याचे मोठे काम एकहाती केले आहे. या प्रसंगी त्यांनी लोकमतच्या संपादकीय मंडळाचे चेअरमन विजय दर्डा यांना हे पुस्तक भेट दिले. 

लोकमतचे वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी, लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक, लोकमतच्या गोवा विभागाचे महाव्यवस्थापक संदिप गुप्ते यावेळी उपस्थित होते.  लोकमतचे संस्थापक दिवंगत जवारहलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन समई प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. राजकीय, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी वेगवेगळ्या क्षेत्रतील मान्यवर तसेच वाचकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावली. आभार प्रदर्शन लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी केले.

Web Title: Celebration of 'Govan of the Year' award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.