गोव्याला नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीचे केंद्र - रविशंकर प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 10:20 PM2018-07-15T22:20:17+5:302018-07-15T22:20:42+5:30
नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीचे केंद्र गोव्यात सुरु करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करील, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.
पणजी : नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीचे केंद्र गोव्यात सुरु करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करील, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. नव्या तंत्रज्ञानामुळे नोक-यांवर गदा येत नाही तर उलट नोक-यांची नवी संधी निर्माण होते, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
राज्याचे आयटी धोरण प्रकाशित केल्यानंतर ते बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राज्याचे आयटीमंत्री रोहन खंवटे, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसचे अध्यक्ष मोहनदास पै, एसटीपीआयचे सरसंचालक ओंकार राय, माहिती तंत्रज्ञान सचिव अमेय अभ्यंकर, इंटेलच्या भारतातील प्रमुख श्रीमती निवृती राय, नॅस्कॉमचे सह संस्थापक अशांक देसाई उपस्थित होते.
प्रसाद म्हणाले की,‘आयटी क्षेत्रात आज ४0 लाखांहून अधिक लोक प्रत्यक्ष काम करीत आहेत. तर सव्वा कोटीहून अधिकजणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे. मोबाइल फोन बनविणारे १२0 कारखाने देशात कार्यरत आहेत. देशात केवळ २ मोबाईल कंपन्या होत्या आज त्या १२0 वर पोचल्या. नव्या तंत्रज्ञानामुळे एक नोकरी गेली तर २0 नव्या नोक-या निर्माण होतात.’ नॅस्कॉमच्या अहवालाचा हवाला देऊन ते पुढे म्हणाले की, ‘कन्वेंशनल आयटी उद्योगांमध्ये ६ लाख रोजगार दरवर्षी निर्माण होतो. नवी डिजिटल इको सिस्टम ब-यापैकी नोक-या निर्माण करील. आज जग भारताकडे या आशेने बघत आहे. २७ शहरांमध्ये ९१ बीपीओ कार्यरत आहे. २0१५ साली ग्रामीण भागांमध्ये बीपीओची योजना आणली. या बीपीओंमध्ये ग्रामीण मुले, मुली काम करतात. आयटी क्रांतीचे नेतृत्त्व करण्याची क्षमता या देशामध्ये आहे.’
ते पुढे म्हणाले की, ‘नोयडा येथे अलीकडेच सॅमसंगच्या विस्तार विभागाचे उदघाटन करण्यात आले तेथे महिन्याला १ कोटी १0 लाख फोन निर्माण होणार आहेत. दरवर्षी २0 कोटी मोबाइल संच विकले जाताते. महसूल १ लाख ३२ हजार कोटींवर पोचला आहे. केवळ मोबाइल इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे तर डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स यातही देश प्रगती करणार आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी गोवा हब बनू शकतो.’
‘१९७0 च्या औद्योगिक क्रांतीला आणि नंतर उद्योजक क्रांतीलाही देश मुकला आता डिजिटल क्रांतीला आम्ही मुकायचे नाही. १ लाख ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या आहेत. उर्वरित पंचायतीसही वर्षअखेरपर्यंत जोडल्या जातील. १२१ कोटी मोबाइल संच आज वापरले जात आहेत.’ आधार कार्डवरील माहिती सुरक्षितच असल्याचा दावा करताना त्याबद्दल कोणी संशय घेण्याचे कारण नसल्याचा दावाही प्रसाद यांनी केला.
डिसेंबरपर्यंत सर्व व्यवहारांचे डिजिटलायझेशन : पर्रीकर
येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व व्यवहारांचे डिजिटलायझेशन होईल, असे पर्रीकर यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, ‘सरकारने धनादेश देण्याचे बंद केले आहे. आर्थिक व्यवहार आता आरटीजीएस किंवा अन्य पद्धतीने केले जातात. सर्व पेमेंट आॅनलाइन होतात.’
माहिती तंत्रज्ञानाचे काही दुष्परिणामही आहेत. खोटी माहिती किंवा अफवा पसरविल्या जातात जे समाजासाठी अत्यंत घातक आहे. माहिती तंत्रज्ञान सर्वत्र पोचले आहे. मोबाइल कनेक्टिव्हीटी मानवी आरोग्यासाठी धाकादायक असल्याची माहिती पसरविली जाते आणि लोक त्यांच्या गावात टॉवर्सना विरोध करु लागतात. खोट्या बातम्या अशा पध्दतीने मारक ठरु शकतात हे लोकांनी जाणले पाहिजे, असे ते म्हणाले.