ब्रिक्स परिषदेला गोव्याला अतिरिक्त सुरक्षा पुरविण्याची केंद्राची ग्वाही
By admin | Published: August 17, 2016 04:47 PM2016-08-17T16:47:04+5:302016-08-17T16:47:04+5:30
गोव्यात येत्या आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या ब्रिक्स परिषदेच्या दिवसांत गोव्याला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारने बुधवारी दिली.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 17 - गोव्यात येत्या आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या ब्रिक्स परिषदेच्या दिवसांत गोव्याला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारने बुधवारी दिली.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली व गोव्यात ब्रिक्सच्या आयोजनाबाबत विविध खाती करत असलेल्या तयारीविषयी त्यांना माहिती दिली. अनेक देशांमधील अतिमहनीय व्यक्ती परिषदेनिमित्त गोव्यात येतील. त्यांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ वाहने व अन्य सुरक्षा व्यवस्था गोव्याला मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली व गृहमंत्र्यांनी ती तत्त्वत: मान्य केली.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली व त्यांनाही तयारीविषयी माहिती दिली. परिषदेवेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. गोव्यातील सांस्कृतिक पथकांना त्यात स्थान मिळावे, अशी विनंती आपण स्वराज यांना केल्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी लोकमतला सांगितले.
15 व 16 आॅक्टोबर रोजी ब्रिक्स परिषद होत असून, त्यानिमित्त 14 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येतील.