गोव्यात पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी केंद्र सरकारकडून 10 कोटी रुपये मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 12:31 PM2017-10-06T12:31:50+5:302017-10-06T12:33:04+5:30
गोव्यात येऊन किनार्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांना अनेकदा शौचालयांअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागते. कपडे बदलण्याच्या खोल्याही नसल्याने पर्यटकांची धांदल उडते. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी केंद्र सरकारने 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
पणजी : गोव्यात येऊन किनार्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांना अनेकदा शौचालयांअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागते. कपडे बदलण्याच्या खोल्याही नसल्याने पर्यटकांची धांदल उडते. यावर उपाय म्हणून आता जागतिक दर्जाच्या काही मूलभूत सुविधा किनार्यांवर उभ्या केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारने त्यासाठी गोव्याला 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
उत्तर गोव्यातील वागातोर, अंजुणा, हरमल, मोरजी, सिकेरी, कळंगुट, कांदोली, बागा अशा किनार्यावर शुक्रवार ते रविवापर्यंत एक लाख पर्यटक असतात. या पर्यटकांना अत्यंत दर्जेदार अशी प्रसाधनगृहे गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून बांधून दिली जाणार आहेत. किनारपट्टीतील आमदार मायकल लोबो यांनी 'लोकमत'ला सांगितले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने एकूण 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
या निधीतून बागा, कलंगुट, कांदोली, सिकेरी अशा भागात पाच शौचालये बांधली जातील. बागा येथे एका शौचालयाचे काम सुरूही झाले आहे. एका शौचालयांच्या कामावर एकूण दीड कोटी रुपये खर्च केले जातील. लोबो यानी सांगितले की, जागतिक दर्जाची ही शौचालये बॅक्टेरियल प्लान्ट्सनी युक्त असतील. बागा येथे अशा एका शौचालयाचे काम सुरू झाले आहे.
पर्यटकांसाठी वाहने पार्क करण्याच्या जागा आता विकसित केल्या जात आहेत. किनार्यांवरील काही जागा पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी त्या जागांचे सौंदर्यीकरण केले जात आहे. यासाठीही पर्यटन विकास महामंडळाने निधी उपलब्ध केला आहे.
विशेष म्हणजे किनारपट्टीत आता मोठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नवा पर्यटन मोसम सुरू झाल्याने किनारपट्टी स्वच्छ केली जात आहे. रोज 10 ट्रक भरलेला कचरा गोळा करून तो कलंगुट पठारावर असलेल्या प्रक्रिया प्रकल्पाच्या ताब्यात दिला जात आहे.