माजी CM पार्सेकर, उत्पल पर्रिकर यांच्या प्रवेशाबाबत केंद्रीय नेते निर्णय घेतील- सदानंद तानावडे
By किशोर कुबल | Published: April 2, 2024 03:11 PM2024-04-02T15:11:32+5:302024-04-02T15:13:54+5:30
वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा स्वगृही
किशोर कुबल, पणजी: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व उत्पल पर्रीकर यांना भाजपात प्रवेश द्यावा की नाही, याबाबत पक्षाचे केंद्रीय नेते निर्णय घेतील. काही नेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या भाजपच्या संपर्कात असल्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी येथील भाजप मुख्यालयात भाजपात प्रवेश केला त्यावेळी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नावर तानावडे यांनी वरील उत्तर दिले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने पार्सेकर यांनी मांद्रे मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तसेच पणजीतही पक्षाने तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकरही अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत दोघांचाही पराभव झाला. वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा त्यावेळी भाजपने तिकीट नाकारल्याने काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांना परत भाजपने परत आणले. या पार्श्वभूमीवर पार्सेकर व उत्पल यांनाही परत पक्षात आणणार का? असा सवाल पत्रकारांनी तानावडे यांना केला असता त्यांनी वरील उत्तर दिले.
तानावडे म्हणाले की,' लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच आणखीही इतर पक्षांचे अनेते भाजपात प्रवेश करणार आहेत.' वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार दाजी साळकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा याप्रसंगी उपस्थित होते.