म्हादईबाबत कर्नाटकला झुकते माप; केंद्र सरकारच्या निर्णयावर गोव्यात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:43 PM2020-02-28T14:43:13+5:302020-02-28T14:43:39+5:30
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आमची भीती खरी ठरली, असे म्हणताना म्हादई बाबतीत आता सर्व आशा मावळल्याची खंत व्यक्त केली आहे.
पणजी : म्हादईबाबत पाणी तंटा लवादाचा कर्नाटकच्या बाजूने असलेला अवॉर्ड केंद्र सरकारने अधिसूचित केल्याने गोव्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या प्रश्नावर केंद्राने गोव्याला वाऱ्यावर सोडल्याचा करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आता म्हादईबाबतच्या सर्व आशा मावळल्या असल्याचे म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हादईबाबतीत केंद्र सरकारने गोव्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकचा पाणी वळविण्याचा हेतू स्पष्ट आहे. गोव्यातील जनतेचा विश्वासघात झालेला आहे. भाजप सरकारने गोमंतकीयांची अवहेलना केली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया कामत यांनी दिली. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने कर्नाटकला झुकते माप दिल्याचे आता उघड झालेले आहे. केंद्रीय जलस्रोतमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटल्यानंतर अवघ्या काही तासातच अधिसूचना आलीच कशी? असा सवाल त्यांनी केला. सरकार दबावाला बळी पडले असल्याचा आरोप त्यांनी केला. कामत म्हणाले की एका बाजूने मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हादईबाबतच
मोठी आश्वासने देत होते तर दुसर्या बाजूला केंद्र सरकार अधिसूचना काढायच्या तयारीत होते. गोव्याला याबाबतीत वाऱ्यावर सोडून विश्वासघात केलेला आहे. संशयाची सुई राज्य सरकारवरच फिरत आहे. गेल्या काही महिन्यात राज्य सरकारने घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. म्हादई प्रश्नावर एक दिवशीय विधानसभेच्या खास अधिवेशनाची मागणी आम्ही केली होती, परंतु ती मान्य केली नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जावे असे आम्ही मागितले होते तेही झाले. तसेच विरोधी आमदारांनी विधानसभेत संयुक्तपणे या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव दिला होता तोही चर्चेला घेतला नाही, असा आरोप कामत यांनी केला ते म्हणाले की, सरकारला वस्तुस्थिती लपवायची आहे. कारण ती उघड झाली तर सरकार तोंडघशी पडणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्वेतपत्रिकाही नाकारली. या सरकारने गोव्याच्या जनतेला उत्तर द्यायला हवे.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आमची भीती खरी ठरली, असे म्हणताना म्हादई बाबतीत आता सर्व आशा मावळ्याची खंत व्यक्त केली आहे. मदतीसाठी मी हे केले आणि मी ते केले, असे सांगणारे सावंत सरकार आता उघडे पडले आहे आणि या सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली. या प्रश्नावर आता भाजप तसेच मुख्यमंत्री प्रमोद यांना काय सांगायचे आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
विश्वासघात केला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
मुख्यमंत्र्यांनी म्हादई कर्नाटकला विकली असा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. लवादाचा अवॉर्ड अधिसूचित झाल्याने गोव्याचा हा विश्वासघात असून राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार विश्वासघातकी आहे हे स्पष्ट झाले आहे. गोव्याच्या हिताचे या सरकारला सोयरसुतक नाही आणि सावंत पर्रीकरांचीच पटकथा पुढे चालवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
गोमंतकीयांचा घात : गोवा प्रोग्रेसिव्ह फ्रंट
गोवा प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे महेश म्हांबरे यांनी यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. संतप्त प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की, केंद्रातील, कर्नाटकातील आणि गोव्यातील भाजप सरकारने मिळून गोमंतकीय जनतेचा घात केलेला आहे. 17 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला ईसी बाबत मुभा देणारे पत्र दिल्याच्या घटनेपासून 24 डिसेंबर पर्यंतचा घटनाक्रम पाहता सर्व गोष्टी कर्नाटकच्या बाजूने होत असल्याची कल्पना आम्हाला नाताळातच आली होती. म्हादई सरकारने विकली. गोवा सरकारने म्हादईसाठी काहीच केले नाही. आता रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र करण्याव्यतिरिक्त पर्याय राहिलेला नाही, असे ते म्हणाले.