गोव्याला मत्स्य उद्योगासाठी केंद्राचे ४०० कोटींचे पॅकेज; केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री गिरिराज सिंह यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 02:51 PM2021-02-07T14:51:27+5:302021-02-07T14:53:12+5:30
४०० कोटी रुपये निधीतून राज्यातील मत्स्य उद्योगाला आणखी चालना देता येईल
पणजी: केंद्र सरकारने गोव्याला मत्स्य उद्योगासाठी ४०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. गोवा भेटीवर असलेले केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री गिरिराज सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, संपूर्ण देशात गोवा मत्स्य उत्पादनासाठी हब बनू शकतो, एवढी ताकद या राज्यात आहे. 'केज कल्चर'ला अर्थात पिंजरे लावून मासळी पकडण्याच्या बाबतीत गोव्यात मोठा वाव आहे आणि या अनुषंगाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच राज्याचे मत्स्योद्योगमंत्री फिलीप नेरी रॉड्रिक्स यांच्याकडे मी चर्चा केली आहे.
राज्याच्या १०५ किलोमीटर किनारपट्टीत सुमारे एक हजार पिंजरे लावून मासळी पकडता येईल. ४०० कोटी रुपये निधीतून राज्यातील मत्स्य उद्योगाला आणखी चालना देता येईल.' ते पुढे म्हणाले की, मासळीच्या बाबतीत गोवा मोठा निर्यातदार होऊ शकतो. आठ ते दहा लाख मेट्रिक टन मासळी गोव्यातून निर्यात करणे शक्य आहे. गोव्यातील खाण व्यवसाय बंद असल्याने राज्य सरकार मत्स्य उद्योगावरच अर्थव्यवस्थेसाठी अवलंबून आहे. मासळी उत्पादन वाढायला हवे. पिंजरे लावून मासळी पकडण्याच्या बाबतीत गोव्यात मोठा वाव आहे.