मुलाचा गळा घोटला तरी मातृत्व जागे नाही! सीईओ सूचना सेठ बनली निर्दयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 09:01 AM2024-01-11T09:01:57+5:302024-01-11T09:02:57+5:30
पतीच्या रागापुढे मुलाच्या मृत्यूचा पश्चाताप नाही; सोशल मीडियावर शिव्यांची लाखोली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/म्हापसा : सूचनाला न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी तिची बुधवारी दिवसभर चौकशी केली. हे कृत्य तिने का केले, पती-पत्नीच्या भांडणात निष्पाप मुलाचा का बळी घेतला, मूल नको होते तर त्याची कस्टडीच का मिळविली, असे अनेक प्रश्न पोलिसांनी केले. परंतु, संपूर्ण चौकशीदरम्यान ती शांतपणे बोलली, काही प्रश्न अडचणीत टाकणारे वाटले, अशा प्रश्नांची उत्तरेच देणे तिने टाळले.
मुलाचा खून केल्याचा आरोप फेटाळताना आपल्या मुलाचा खून आपण कसा करू शकते, असा उलटप्रश्नही तिने पोलिसांना केला, खून केला नाही तर मृतदेह बॅगमध्ये घालून का नेला, असे विचारले तेव्हा उत्तरे देणे तिने टाळले. हे कृत्य केल्यानंतर तिने आपली नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. तसे पुरावे मात्र मिळालेले नाहीत. तसेच मुलाच्या मृत्यूचे तिला दुःख आहे असे तिच्या वागण्यावरून दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे मुलाच्या मृत्यूबद्दल विचारणा होत असताना तिच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही आला नाही. परंतु जेव्हा जेव्हा तिच्या पतीविषयी पोलिसांनी प्रश्न केले तेव्हा मात्र तिच्या उत्तरातून पती व्यंकटरमणविषयी असलेला संताप झळकत होता, आता इतके सारे करूनही तिचा पतीवरील राग शमलेला
नाही.
आपल्या ४ वर्षाच्या मुलाला गळा आवळून ठार मारल्यानंतर पोलिसांनी पकडलेल्या सूचनाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कसलाही लवलेश नव्हता. खून करून त्याचे पार्थिव बॅगेत घेऊन जाणाऱ्या सूचनाचे मातृत्वही जागे झाले नाही. तपासात उत्तरे देणाऱ्या सूचनाला पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले.
मृतदेह बॅगमध्ये घालून गोव्याहून बंगळूरला पळ काढत असताना पोलिसांनी तिला पकडले. ही बातमी प्रसिद्ध होताच कोण ही सूचना हे पाहण्यासाठी लोकांनी गुगल सर्च इंजिनवरून तिची माहिती घेण्यास सुरुवात केली, त्यानंतर तिला ट्रोल करणे सुरु केले आहे. एक्सवरून तर शिव्यांच्या लाखोल्याच वाहिल्या जात आहेत.
मुलाची कस्टडी आईकडे देण्यात आली होती. परंतु आठवड्यातून एक दिवस विभक्त पती व्यंकटेश मुलाला भेटू शकत होता, भेटण्याचा दिवस रविवार ठरला होता. मुलाला आईपेक्षा बाबाची ओढ अधिक होती आणि वडिलांना तडफडविण्यासाठीच तिने मुलाचा काटा काढला होता, असा निष्कर्ष आतापर्यंतच्या तपास कामातून आला आहे.
थियोरेटिक फिजिक्स या विषयातून डॉक्टरेटचे (पीएच.डी.) शिक्षण घेण्यासाठी २०१७ साली ती न्यूयॉर्कला गेली होती, त्यानंतर २०१७ साली हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला; पण शिक्षण पूर्ण न करताच ती २०१८ साली भारतात परत आली. ज्या हॉटेलात सूचना उतरली होती, त्या हॉटेलमध्ये फक्त रिसेप्शन- वरच सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने तपासकार्यात थोडा अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
'ते' डाग कसले?
ज्या हॉटेलात ती उतरली होती, त्या हॉटेलातील खोलीत पोलिसांना रक्ताचे डाग असलेला एक टॉवेल सापडला आहे. मासिक पाळीमुळे त्या टॉवेलवर रक्त्त सांडल्याचा दावा पोलिसांच्या चौकशीत तिने केला आहे. तो टॉवेल फोरेन्सिक तपासणीसाठी पाठवून देण्यात येणार आहे. तसेच, खोलीतून उशी व सिरपच्या बाटल्याही कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
रात्री १२.३० वाजता सोडली खोली
ज्या हॉटेलात सूचना उत्तरली होती त्या हॉटेलचे बुकिंग तिने ४ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने केले होते. बुकिंग ६ ते १० जानेवारीपर्यंत अशी ५ दिवसांचे होते. मात्र, ७ जानेवारीला हॉटेल सोडण्याचा निर्णय तिने घेतला. तशी कल्पना रात्री ९.१० वा. हॉटेल रिसेप्शनला देऊन मध्यरात्री १२.३० वा. खोली सोडली.
चोर्लात अडकली
सूचना बंगळुरूला टॅक्सीने निघाली असताना चोर्ला घाटात वाहतूक कोंडी झाल्याने ती अडकून पडली. त्यामुळे गोवा पोलिसांना तिचा शोध घेण्यासाठी वेळ मिळाला. याच वेळेचा व्यवस्थित उपयोग पोलिसांनी करून तिला बंगळूरला पोहोचण्यापूर्वीच पकडले.
ऑफिस नसलेली सीईओ
स्वतःच्या कोवळ्या मुलाची हत्या करणारी बंगळूरूस्थित आर्टिफिशियल इंटेलिजेन्स स्टार्टअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सूचना सेठ हिच्या कंपनीला कळंगुट पोलिसांच्या तुकडीने भेट दिली. त्या ठिकाणी पोलिसांना सुचनाचे स्वतंत्र कार्यालय सापडले नाही. इतर सहकाऱ्यांबरोबरच तिची
आसनव्यवस्था होती. इतक्या मोठ्या कंपनीची सीईओ असूनही तिचे स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटले.
दर महा २.५ लाख
सूचनाने पतीवर घरगुती छळाचा तिने आरोप केला होता. आरोपांना पुष्टी देणारे व्हॉटसेप चॅट आणी फोटोही तिने न्यायालयात सादर केले आहेत. पतीचे उत्पन्न वर्षाकाठी १ कोटी रुपये असल्याचे तिने म्हटले होते, त्यामुळे पतीकडून दरमहा अडीच लाख रुपये देखभाल भत्त्याची मागणी तिने केली होती.
व्यंकटरमण यांची शनिवारी जबानी
सूचनाचे पती व्यंकटरमण यांची ज़बानी नोंद करून घेण्यासाठी शनिवार, दि. १३ रोजी कळगुट पोलिसांनी त्यांना पाचारण केले आहे. हॉटेलात उतरल्यानंतर हॉटेलातून किंवा आपल्या खोलीतून एकदाही ती चाहेर पडली नाही, फक्त हॉटेल सोडण्याच्या वेळी ती बाहेर पडली.
सोशल मीडियावरून
शिव्यांच्या लाखोल्या चार वर्षांच्या पोटच्या पोराचा गळा आवळून खून करणत्या सूचना सेठ ही सोशल मीडियावर ट्रोल होत असून लोक तिला शिव्यांच्या लाखोली वाहून आपला संताप व हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.
चिन्मयवर अंत्यसंस्कार...
सूचना आणि व्यंकटरमण यांच्या मुलाचे पार्थिव त्यांच्या बंगळूरू येथील यशवंतपूरजवळील ब्रिगेड गेटवे रेसिडेन्सीत नेण्यात आले. नंतर तेथून हरिश्चंद्र घाटावर नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील व्यंकटरमण यांच्या उपस्थितीत हे अत्यसंस्कार झाले. मुलाचे कुटुंबीयही तिथे होते. दरम्यान, कर्नाटक आणि गोवा पोलिसांनी ब्रिगेड अपार्टमेंट कॉम्प्लेक्सभोवती कडेकोट बंदोबस्त आहे.