सभापतींनी रोखले मुख्यमंत्र्यांना...
By admin | Published: August 7, 2015 02:10 AM2015-08-07T02:10:29+5:302015-08-07T02:10:40+5:30
पणजी : जुने गोवे येथे एका फ्लॅटमध्ये खोर्ली येथील विधवेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पूर्ण कथानकाचे वाचन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे
पणजी : जुने गोवे येथे एका फ्लॅटमध्ये खोर्ली येथील विधवेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पूर्ण कथानकाचे वाचन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे गुरुवारी विधानसभेत करत असताना सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी हस्तक्षेप केला व त्यांना थांबविले. प्रत्यक्ष कारवाईच्याच विषयाबाबतची माहिती द्यावी, अशी सूचना सभापतींनी मुख्यमंत्र्यांना केली.
दोन दिवसांपूर्वी ३० वर्षीय विधवा मोलकरणीवर आठ युवकांनी बलात्कार करण्याची घटना घडली. त्यात एका पोलिसाचाही समावेश आहे. मूळ बेळगाव येथील ही मोलकरीण खोर्ली येथे राहते. तिच्यावर २९ जुलै रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराचा मुद्दा आमदार विष्णू वाघ यांनी शून्य प्रहरावेळी विधानसभेत उपस्थित केला व आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी केली. या वेळी आपण त्या महिलेची पूर्ण तक्रारच वाचून दाखवतो, असे सांगून मुख्यमंत्री इंग्रजीत असलेली ती तक्रार वाचू लागले. मुख्यमंत्री मध्ये कुठे तरी थांबतील, असे प्रथम काही अपक्ष आमदारांना वाटले; पण मुख्यमंत्री थांबेनात. ते पूर्ण तक्रार वाचून दाखवू लागले. बलात्कार झालेल्या महिलेची ओळख पटणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली; पण इतर बराच तपशील ते वाचू लागले.
त्या महिलेला मुलावर उपचार करण्यासाठी पैसे हवे होते. एका युवकाने तिला २ हजार रुपये देतो, असे सांगितले व त्या बदल्यात आपल्याला शरीरसुख देण्याची विनंती केली. तिने ती मान्य केली, असा तक्रारीतील मजकूर मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. तिथे असलेल्या २७ वर्षीय योगेश खांडेपारकर या पोलिसानेही तिच्याकडे तशीच अपेक्षा व्यक्त केली. आपली अपेक्षा पूर्ण होत नसेल, तर आपण पोलिसांची जीपगाडी फ्लॅटकडे बोलवतो, असेही त्या पोलिसाने मोलकरणीला सांगितले. नंतर
त्या पोलिसासह एकूण आठजणांनी तिच्यावर बलात्कार केला, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या वेळी अपक्ष आमदार विजय सरदेसाई उभे राहिले. बलात्कार प्रकरणात आरोपींविरुद्ध कारवाई काय केली, ते सांगा. चौघांना पकडलेय व बाकीचे आरोपी तुम्हाला मिळालेले नाही, असे सरदेसाई यांनी नमूद केले. या वेळी सभापती आर्लेकर यांनीही बलात्काराच्या तक्रारीचा तपशील वाचू नका, कारवाई झाली असेल तर त्याविषयी माहिती द्या, अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी त्या सूचनेनुसार नंतर कारवाईबाबतची माहिती दिली व आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होईल,
याची हमी दिली. (खास प्रतिनिधी)