गोव्यात भाजप नेतृत्वाला आव्हान, माजी मुख्यमंत्री पार्सेकर आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 06:58 PM2020-12-28T18:58:45+5:302020-12-28T18:59:46+5:30
भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड हे दोन दिवसांपूर्वीच मांद्रे मतदारसंघात गेले होते. तिथे ते आमदार सोपटे यांनाही भेटले होते. सोपटे व धोंड यांनी एकत्र जत्रोत्सवाला भेट देऊन एका मंदिरासही भेट दिली होती.
पणजी : भारतीय जनता पक्षात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर विरुद्ध मांद्रेचे भाजप आमदार दयानंद सोपटे असा संघर्ष उफाळून आला आहे. भाजपच्या मंडळाला पुढे करून सोपटे यांनीच आपल्याविरुद्ध पत्रकार परिषद घ्यायला भाग पाडली, अशी पार्सेकर यांची भावना झाली आहे. पार्सेकर यांनी आक्रमक भूमिका घेत सोपटे व मांद्रे भाजप मंडळाचाही सोमवारी समाचार घेतला. एक प्रकारे भाजप नेतृत्वालाच पार्सेकर यांच्या आक्रमक पवित्र्याने आव्हान दिले आहे.
भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड हे दोन दिवसांपूर्वीच मांद्रे मतदारसंघात गेले होते. तिथे ते आमदार सोपटे यांनाही भेटले होते. सोपटे व धोंड यांनी एकत्र जत्रोत्सवाला भेट देऊन एका मंदिरासही भेट दिली होती. त्यानंतर लगेच रविवारी भाजपचे मंडळ अध्यक्ष, तसेच भाजपचे जि. पं. निवडणुकीतील दोन पराभूत उमेदवार यांनी एकत्र येऊन चक्क आमदार सोपटे यांच्या कार्यालयातच पत्रकार परिषद घेतली.
भाजपच्या दोन्ही जि. पं. उमेदवारांचा पराभव हा पार्सेकर यांच्यामुळे झाला, पार्सेकर यांनी पक्षविरोधी काम केले, अशी भाषा मंडळ अध्यक्ष व इतरांनी वापरली. पार्सेकर यांच्या मते, या मंडळ अध्यक्षांचा बोलविता धनी वेगळा आहे. पार्सेकर यांनी सोपटे यांचे नाव घेणे टाळले. पण पत्रकार परिषदेवेळी सोपटे यांनीच मंडळ अध्यक्ष व इतरांकडून आपल्याविरुद्ध सारी विधाने करून घेतली, असे पार्सेकर यांना वाटते. अध्यक्ष मधू परब व अनंत गडेकर यांचा बोलविता धनी वेगळा आहे, अशी टीप्पणी पार्सेकर यांनी वारंवार केली.
पार्सेकर यांनी पक्षविरोधी कारवाया करून भाजपचे उमेदवार पाडले, त्यांनी पक्षात राहायचे की सोडून जायचे ते एकदा ठरवावे, असे आव्हानच पार्सेकर यांना भाजपच्या मंडळाने दिले. पार्सेकर हे यामुळे संतापले आहेत. काँग्रेसमधून जे भाजपमध्ये आले आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे व आमची संस्कृती वेगळी आहे. आम्ही आमदारकी किंवा मंत्रीपद कधी भोगत नसतो तर ते भूषवित असतो, असा टोला पार्सेकर यांनी लगावला. जे साडेसतरा हजार मतांनी २०१७ साली निवडून आले होते, त्यांची गाडी आता सात हजार मतांपर्यंत घसरलेली आहे, अशा शब्दांत पार्सेकर यांनी सोपटेंवर थेट निशाणा साधला. मंडळाने पत्रकार परिषदा घेऊन त्याद्वारे मुख्यमंत्री किंवा भाजप अध्यक्षांकडे समस्या मांडणे ही भाजपमधील संस्कृती नव्हे, भाजपमध्ये असे कधीच घडत नाही, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
तानावडेंनी मागितले स्पष्टीकरण
भाजपच्या ज्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व पराभूत उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन पार्सेकरांविरुद्ध टीका केली, त्या कार्यकर्त्यांची दखल प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी लगेच घेतली. तानावडे यांनी संबंधितांना सोमवारीच फोन केले व स्पष्टीकरण मागितले. तुम्ही अशा प्रकारे भाजप नेत्याविरुद्धच पत्रकार परिषद कधी काय घेऊ शकता, ते आपल्याला सांगा, असे तानावडे यांनी संबंधितांना विचारले व पक्षाच्या पणजीतील कार्यालयातही काहीजणांना बोलावून घेतले आहे.
जि. पं. निवडणुकीतील पराभवाचे खापर अकारण माझ्यावर फोडण्याचा हा प्रकार आहे. भाजपमध्ये संस्कृती वेगळी आहे, हे दीड वर्षापूर्वी बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांनी लक्षात घ्यावे. भाजपमध्ये आमदारकी किंवा मंत्रीपदे भोगली जात नाहीत, तर ती भूषविली जातात. भोगण्याची संस्कृती भाजपमध्ये नाही. काहीजण वेगळ्या पक्षातून व वेगळ्या विचारसरणीतून आले, त्यांच्याकडे कदाचित तशी संस्कृती असावी.
- लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री