गोवा पोलिसांना सतावतेय खब-यांची चणचण, ड्रग्सविरोधी कारवाईसाठी आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 09:09 PM2017-12-26T21:09:40+5:302017-12-26T21:10:02+5:30
गोव्यात पर्यटकांना भरती आणि अंमलीपदार्थांच्या व्यापा-यांना उधाण हे एकाचवेळी येते आणि एकाचवेळी येते असे पोलीसांच्या नोंदी स्पष्ट करतात.
पणजी: गोव्यात पर्यटकांना भरती आणि अंमलीपदार्थांच्या व्यापा-यांना उधाण हे एकाचवेळी येते आणि एकाचवेळी येते असे पोलीसांच्या नोंदी स्पष्ट करतात. अंमलीपदार्थांच्या व्यवहारही लक्षावधीपासून कोट्यवधी रुपयांचे होऊ लागले असताना गोवा पोलिसांना समस्या सतावते आहे ती खब-यांची. पोलिसांना माहिती देणारे खबरेच आता कमी होऊ लागल्यामुळे माहिती मिळवायची कशी हे आव्हान पोलिसांपुढे आहे.
डिसेंबर महिन्यात पर्यटकांचे जथेच गोव्यात असताना गोवा पोलिसांनी १ कोटीहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ पकडण्यात यश आले असले तरी अनेक कोटी रुपये किंमतीचा अंमलीपदार्थ गोव्यात आणला जात असल्याचा संशय गुप्तचर विभागाला आहे. अलिकडील काही घडामोडींमुळे तसे संकेतही मिळाले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची गोष्ट असो किंवा ड्रग्सचे व्यवहार रोखणे असो सर्व कामांची मदार असते ती गुप्तचर विभागावर. त्यातल्या त्यात अंमली पदार्थांच्या बाबतीत तर गुप्तचरांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. अंमली पदार्थांचे व्यवहार कुठे होतात, त्यात कोण कोण लोक गुंतलेले असतात आणि व्यवहारांच्या नेमक्या जागा कोणत्या याची सविस्तर माहिती हे खबरे ठेवतात. त्यांच्याकडून पोलिसांना माहिती मिळते आणि त्यानुसार सापळा रचून पोलीस कारवाई करतात. खब-यांना त्यांनी पुरविलेल्या माहितीनुसार मोबदला म्हणून काही तरी रक्कम दिले जाते. गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाकडे १२ वर्षांपूर्वी डजनभर तरी खबरे होते. आता अर्धेही राहिले नाहीत अशी माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे कारवाया करणे हे पोलिसांना आव्हान बनले आहे.
खब-यांची संख्या रोडावण्याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना दिला जाणारा मोबदला. अंमली पदार्थाच्या व्यवहाराची जो माणूस माहिती ठेवतो आणि पोलिसांशी संधान बांधून असतो तो केवढी मोठी जोखीम घेत असतो याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. एवढे करूनही त्याला मिळणारा मोबदला हा अल्प असेल तर तो कशाला या भानगडीत पडेल असे खुद्द पोलीस सांगतात. वरिष्ठ अधिका-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खब-यांना दिल्या जाणारा भत्ता वाढवून देण्यात यावा यासाठी पोलीस खात्याने सरकारला प्रस्ताव पाठविला होता. परंतु अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याची माहिती देण्यात आली.