पत्रकारितेसमोर आव्हान विश्वासार्हता जपण्याचे - दिनकर रायकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 09:07 PM2018-11-16T21:07:40+5:302018-11-16T21:07:49+5:30
विश्वासार्हता टिकवायची असेल तर पत्रकारांनी अष्टोप्रहर जागृत राहून तपशिलांविषयी खात्री पटल्यावरच बातमी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी येथे शुक्रवारी केले.
पणजी : तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता गतीशरण झालेली आहे. गतीच्या हव्यासातून दिलेल्या बातम्यांच्या आणि पत्रकारितेच्याही विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विश्वासार्हता टिकवायची असेल तर पत्रकारांनी अष्टोप्रहर जागृत राहून तपशिलांविषयी खात्री पटल्यावरच बातमी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी येथे शुक्रवारी केले.
राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने माहिती आणि प्रसिद्ध खात्याने रायकर यांचे ‘पत्रकारिता : नैतिकता आणि डिजिटल युगातील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजिले होते. इन्स्टिट्यूट आॅफ मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव सुधीर महाजन, संचालक गुरुदास पिळर्णकर, गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर उपस्थित होते. ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी रायकर यांची ओळख करून दिली.
रायकर यांनी आणीबाणीच्या काळातील पत्रकारितेवर लादलेल्या निर्बंधांची माहिती भाषणाच्या प्रारंभी दिली. त्या वेळी काँग्रेसच्या विरोधात सर्वत्र एकच उमेदवार उभा करण्यास माध्यमांनी विरोधकांना भाग पाडले. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पाडाव झाल्यानंतर जी पहिली घटना दुरुस्ती मंजूर केली ती आणीबाणीची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेणारी होती, असे सांगत हे प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे घडल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर तंत्रज्ञानाच्या गतीमुळे पत्रकारितेचे स्वरूप कसे बदलले आहे, याचा ऊहापोह त्यांनी केला. धैर्य, विश्वासार्हता आणि सत्य ही पत्रकारितेची ताकद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या गतीमुळे चुकीच्या बातम्यांचेही वहन गतीने होते आहे आणि पत्रकारितेपुढे हे मोठे आव्हान आहे. अशी आव्हाने पेलली पाहिजेत. त्यासाठीच बातमीची खात्री करा, खात्रीशीर बातमीच प्रसिद्ध करा आणि विश्वासार्हता जपा, असा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला. केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यातील कथित संघर्षाच्या बातमीचे उदाहरण देत शहानिशा न करताच यासंदर्भात येणाऱ्या बातम्या एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणाºया असून हे प्रकार राष्ट्रीय पातळीवरही घडत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
एक्स्क्लुझिव्ह, सुपर एक्स्क्लुझिव्ह आणि ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात वर्तमानपत्रे दुसºया दिवशी जुन्याच बातम्या देतात, मग त्यांचे अस्तित्व कसे राहील, असा प्रश्न रायकर यांनी उपस्थित केला.
तंत्रज्ञानाच्या गतीत आता माहिती खूप असते, तिथे संशोधन नसते. नुसती माहिती म्हणजे बातमी नव्हे, असे सांगत त्यांनी असंतुष्ट पत्रकारितेच्या धोक्यावर बोट ठेवले. खूप माहिती असणे ही सामग्री (डाटा) झाली; पण सामग्री आणि बातमीत फरक आहे. याचा विचार न होता स्पर्धेच्या गतीत एका ओळीची ब्रेकिंग न्यूज देण्याची घाई केली जाते. आणि एक कळ (बटण) दाबताच फेक न्यूज इंडस्ट्री आकाराला येते. देशातील हा अत्यंत घातक प्रवाह आहे. लोकशाहीसमोरचे हे धोके आहेत. त्यावर तातडीची उत्तरे नसली तरी समाधान सापडेल याबाबत आपण आशावादी आहे, असे ते म्हणाले.