पावसाची शक्यता कायम, येलो अलर्ट केला जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 09:45 AM2024-05-21T09:45:33+5:302024-05-21T09:46:31+5:30
उत्तर आणि दक्षिण गोव्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अंदामानमध्ये मान्सून दाखल झाल्याने हवामानातील बदल जाणवू लागला आहे. खात्याने मंगळवारीही येलो अलर्ट जारी केला आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच किनाऱ्यावर जाण्याचे तसेच जलक्रीडा उपक्रम टाळावेत, अशी सूचनादेखील हवामान खात्याने केली आहे.
सोमवारी आलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे. पाटो येथे दोन झाडे कोलमडून पडल्याने वाहतूक समस्या निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत स्थिती नियंत्रणात आणली.