मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा 'नाताळ'; गोव्यातील काही मंत्री, आमदारांचे दिल्लीत जोरदार लॉबिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2024 11:06 AM2024-12-12T11:06:37+5:302024-12-12T11:08:28+5:30
बी. एल. संतोष यांनी काहीजणांच्या कामगिरीचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील काही मंत्री, आमदारांनी दिल्लीत लॉबिंग चालविले आहे. मंत्रिमंडळ फेररचनेचे संकेत मिळाल्याने काही मंत्री आपले मंत्रिपद वाचविण्यासाठी तर काहीजण वजनदार खाती मिळवण्यासाठी धडपडत आहेत. काही आमदार आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी दिल्ली वाऱ्या करू लागले आहेत. कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा हे तूर्त दिल्लीत आहेत, तर उत्तर गोव्यातील दोन मंत्री हे दिल्लीहून गोव्यात परतले आहेत. नाताळ सणापूर्वी किंवा नंतर मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे.
उत्तर गोव्याचे एक आमदार नुकतेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन गोव्यात परतले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकाल होऊन तिथे सरकारही स्थापन झाले. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते आता गोव्यात बदल करण्यासाठी मोकळे झाले आहेत. गोव्यासाठी मंत्रिमंडळ फेररचनेची योजना दिल्लीत पक्की झाली आहे. या अनुषंगाने मंत्री, आमदारांच्या दिल्लीवाऱ्या वाढलेल्या आहेत. दरम्यान, मांद्रेचे मगोपचे आमदार जीत आरोलकर हे भाजपच्या अत्यंत निकट असून, तरुण आमदार म्हणून त्यांचाही मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो, अशी एक चर्चा होती. परंतु, जीत यांनी या टर्ममध्ये मंत्रिपद नकोय. त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती मिळते. जीत यांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या मतदारसंघात जी विकासकामे चालू आहेत ती पुढेही चालूच राहावीत तसेच मतदारसंघातील लोकांना नोकऱ्याही मिळाव्यात. आपल्याला लोकांनी विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. मंत्रिपदासाठी नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे.
काही जणांनी मुंबई, नागपूरमध्येही भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. मंत्री खंवटे यांच्या आसनास मुळीच धक्का बसणार नाही पण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. मंत्री नीळकंठ हळर्णकर, गोविंद गावडे, सभापती रमेश तवडकर व आमदार दिगंबर कामत यांच्याविषयी दिल्लीत विचारविनिमय जोरात सुरू आहे. गोव्यातील भाजप नेत्यांकडून बी. एल. संतोष यांनी काही मंत्र्यांच्या व आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे.
कामत शिर्डीहून परतले
मंत्रिमंडळात दिगंबर कामत यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा देखील पसरली आहे. कामत दिल्लीला गेले असल्याची चर्चा रंगली होती. पण प्रत्यक्षात कामत हे शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. तत्पूर्वी ते लंडनच्या दौऱ्यावर होते. शिर्डीहून परवाच ते गोव्यात परतले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आसाम येथील एका देवस्थानास भेट देण्यासाठी काल गेले होते. तेही गोव्यात परतले आहेत.
आलेक्स सिक्चेरा दिल्लीत दाखल
दोघा आमदारांनी गेल्याच आठवड्यात बी. एल. संतोष यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी गोव्यातील मंत्री तसेच काही भाजप आमदारांच्या कामाचा अप्रत्यक्ष आढावा घेतला. गोव्यातील राजकीय स्थितीविषयी तसेच नुकत्याच झालेल्या सदस्यता नोंदणीविषयी भाजपच्या एका नेत्याने त्यांना सविस्तर माहिती दिली. मंत्री रोहन खंवटे हे नुकतेच दिल्लीला जाऊन आले. ते गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये दिल्लीला होते. त्यांनी काही नेत्यांची भेट घेतली आहे.