डॉक्टर झाल्यावर परदेशात जाण्याची मानसिकता बदला; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 07:47 AM2024-10-21T07:47:28+5:302024-10-21T07:48:06+5:30
आयएमए फोंडाचा सुवर्ण महोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यात आरोग्यविषयक साधन सुविधा निर्माण करण्यात सरकार पुढे आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही गोवा मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या जागा वाढवल्या; परंतु डॉक्टर झाल्यानंतर विदेशात जाण्याची मानसिकता निर्माण होऊ लागली आहे. तेथे डॉक्टरांना चांगला मोबदला मिळत असला तरी येथील आरोग्य क्षेत्रावर त्यामुळे अप्रत्यक्षपणे ताण येतो. त्यामुळे येथील डॉक्टरांनी गोव्यातच राहून गोमंतकीयांची सेवा करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या फोंडा शाखेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. व्ही. अशोकन्, डॉ. दत्ताराम देसाई, डॉ. श्वेता खांडेपारकर, डॉ. सूरज काणेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, एकेकाळी फॅमिली डॉक्टर संकल्पना होती. आता कॉर्पोरेट काळात डॉक्टर व पेशंटमधील जिव्हाळा कमी होऊ लागला आहे. त्याला कारण केवळ डॉक्टर नाहीत. आज सरकारी इस्पितळात लोकांच्या रांगा दिसून येतात. डॉक्टरांना दीडशे दोनशे लोकांना तपासावे लागते. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांमधील जिव्हाळा निर्माण करण्यात वेळ कमी मिळतो.
आजारी पडल्यावर खर्च करण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून लोकांनी खर्च करायला हवा. लोक आजारी पडू नयेत, हा ट्रेंड आता डॉक्टरांनी निर्माण करायला हवा. त्यासाठी सरकार मदत करायला तयार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी ए.व्ही. अशोकन् म्हणाले की, आपल्या देशाला आयएमए फोंडा शाखेचा अभिमान आहे. पेलेटिव्ह केअर क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची देशात दखल घेतली जात आहे. यापुढेसुद्धा संस्थेने आपल्या कार्याच्या माध्यमातून आदर्श निर्माण करत राहावे. यावेळी दत्ताराम देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अजय पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव एरोन सुवारिस यांनी आभार मानले.
'तो' निधी कधीच बंद होणार नाही
दिलासाच्या माध्यमातून पॉलिटिव्ह केअर क्षेत्रात आयएमए फोंडाने जे काम केले आहे, त्याचा आदर्श आज प्रत्येकजण घेत आहे. त्यांची तळमळ लक्षात घेऊन मी सरकारच्या माध्यमातून त्यांना खास अनुदान मिळवून दिले आहे. पुढे कोणीही मुख्यमंत्री झाला तरी त्यांच्या निधीवर टाच येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
डायलिसिसच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता
राज्यात डायलिसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री म्हणून मलाही चिंता आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात डायलिसिस युनिट सुरू केले आहे. तरीसुद्धा ती अपुरी पडू लागली आहेत. यावर आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी अभ्यास करायला हवा. सुदृढ आरोग्यशैली निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.