गोव्यात दिवाळीच्या शालेय सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे बदल, २५ ॲाक्टोबर ते १८ नोव्हेंबर शाळा बंद राहणार
By किशोर कुबल | Published: October 3, 2023 05:59 PM2023-10-03T17:59:42+5:302023-10-03T18:00:32+5:30
२० नोव्हेंबर रोजी शाळा सुरु होतील...
पणजी : शाळांसाठी असलेल्या दिवाळीच्या सुट्टीत शिक्षण खात्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे बदल केले असून आता बुधवार २५ ॲाक्टोबर ते शनिवार १८ नोव्हेंबर अशी सुट्टी असणार आहे. सोमवारी २० नोव्हेंबर रोजी शाळा सुरु होतील.
पूर्वी ७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर अशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. २५ ॲाक्टोबरपासून राज्यात ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन होणार असून ९ नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. देशभरातील क्रीडा संघ गोव्यात येणार आहेत.
शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि,‘ विद्यार्थांनाही या स्पर्धा पाहता याव्यात यासाठी तसेच या स्पर्धांच्यावेळी बालरथांचा वापर स्वयंसेवकांना नेण्या आणण्याकरिता वापरल्या जाणार आहेत त्यामुळे बालरथ विद्यार्थ्यांसाठी अनुपलब्ध असतील. त्यामुळे सुट्टीचे वेळापत्रक बदलण्यात आले. सुमारे ३ हजार महाविद्यायलीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहेत.’
विद्यापीठाकडूनही महाविद्यालयीन सुट्ट्यांच्या वेळापत्रकात बदल केला जाईल. दरम्यान, काही शाळांमध्ये शिक्षकांनी पूर्वी जाहीर केलेल्या सुट्टीच्या अनुषंगाने सहली आयोजित केल्या होत्या. अनेकजण राज्याबाहेर पर्यटनाला जाणार होते. त्यांचा हिरमोड झाला.