ज्ञानदान पद्धतीत बदल आवश्यक
By admin | Published: May 1, 2016 02:25 AM2016-05-01T02:25:16+5:302016-05-01T02:38:11+5:30
पणजी : आज आपल्या देशात चाळीस हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. तरीही आपण सर्व स्तरांमधील मुलांपर्यंत पोहोचण्यास
पणजी : आज आपल्या देशात चाळीस हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. तरीही आपण सर्व स्तरांमधील मुलांपर्यंत पोहोचण्यास कमी पडतोय. आजच्या पारंपरिक ज्ञानदानाच्या पद्धतीत कालानुरूप बदल होणे आवश्यक आहे. आजची शिक्षण पद्धती दुर्दैवाने विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करत नाहीत. सर्व प्रकारच्या भौगोलिक सीमा पार करून तंत्रज्ञानाच्या आधारे आजचे शिक्षण सर्वव्यापी होणे महत्त्वाचे आहे. आज विद्यापीठाने जागतिक ज्ञानकेंद्र बनले पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
एस. एस. धेंपो वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारोह आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. वाय. व्ही. रेड्डी, उच्च शिक्षण संचालक प्रा. भास्कर नायक, धेंपो चॅरिटी ट्रस्टच्या विश्वस्त पल्लवी धेंपो, यतीश धेंपो, प्राचार्या डॉ. राधिका नायक आणि उपप्राचार्य हमीद खानापुरी उपस्थित होते. मिरामार येथील गास्पार डायस सभागृहात हा सोहळा आयोजित केला होता.
देशमुख म्हणाले, आजच्या अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने मुंबई विद्यापीठाने पाऊल उचलले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व अभ्यासक्रमांत बदल केला जाणार आहे. आपण पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून नव्या शैक्षणिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. तरच आपण अशिक्षित मुलांपर्यंत पोहोचू, असे त्यांनी नमूद केले.
राज्यातील विद्यापीठांनीही आॅनलाईन पद्धत वापरून मुली व महिलांपर्यंत पोहोचावे, असे ते म्हणाले. या वेळी इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.
महाविद्यालयाचे माजी प्रशासक जी. आर. सरदेसाई आणि विद्यमान प्रशासक सुनील प्रभूदेसाई यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ‘धेंपोआईट’ या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. पल्लवी धेंपो यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षाचा आढावा घेतला. पल्लवी वागळे यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)