राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 07:51 AM2024-01-23T07:51:45+5:302024-01-23T07:53:13+5:30

दिवसभर सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण होते.

chanting of rama nama everywhere in the goa pooja maha aarti and dev darshan by chief minister ministers mla | राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन

राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : अयोध्येतील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये धार्मिक विधी झाले. रामनामाच्या जयघोषाने गोमंतनगरी दुमदुमून गेली. काल दिवसभर सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सकाळीच त्यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघात सपत्निक विविध मंदिरांना भेट देऊन देवदर्शन घेतले व पूजा, प्रार्थना व इतर धार्मिक विधी केले. दुपारी अयोध्येत राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा गोव्यातील मंदिरांमध्येही रामनामाचा जयघोष करण्यात आला.
राम नामाचा जप अखंड चालू होता तसेच महाआरती, भजने, कीर्तनेही झाली. सायंकाळी दिंड्या, शोभायात्राही झाल्या. राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली. देवदर्शनासाठी अनेक मंदिरांमध्ये रांगा लागल्या होत्या.

राजधानी शहरात भाटलेतील तसेच कोलवाळ, पर्वरी वडेश्वर, गिमोणे काणकोण तसेच इतर ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये मोठी गर्दी होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

५५ हजार पणत्या...

वाळपई येथे काल विक्रमी ५५ हजार पणत्या लावून प्रभू श्रीरामांची प्रतिमा साकारण्यात आली. श्री रामज्योती प्रज्वलित करण्याचा शासकीय पातळीवरील प्रमुख कार्यक्रम काल सायंकाळी पर्वरी येथे एससीईआरटी इमारतीजवळ झाला. 

सत्तरीतून तीन वर्षात १५ हजार भाविकांना अयोध्येला पाठवणार

सत्तरी, उसगावमधून पुढील तीन वर्षात १५ हजार भाविकांना अयोध्येला प्रभू श्रीराम दर्शनासाठी पाठवले जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. येत्या महिन्यापासून प्रत्येक आठवड्याला एक भाविकांची एक तुकडी अयोध्येला जाईल, असे ते म्हणाले.
 

Web Title: chanting of rama nama everywhere in the goa pooja maha aarti and dev darshan by chief minister ministers mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.