माजी पासपोर्ट अधिकारी आग्नेल फर्नांडिस याच्या विरोधात आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 06:36 PM2019-07-03T18:36:46+5:302019-07-03T18:37:47+5:30
दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नाडिस यांच्या विरोधात सीबीआयने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले
मडगाव: दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नाडिस यांच्या विरोधात सीबीआयने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, फर्नांडिस हे पासपोर्ट खात्याचे अधिकारी असताना त्यांच्याकडे 70.71 लाखांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. एप्रिल 2013 ते एप्रिल 2016 अशी तीन वर्षे फर्नांडिस यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रतिनियुक्तीवर पणजीच्या पासपोर्ट कार्यालयात उपपासपोर्ट अधिकारी म्हणून नेमले होते.
2015 साली सीबीआयने त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला असता 3.71 लाखांची रोख, 104 महागडय़ा दारूच्या बाटल्या, 115 शर्ट, 39 टाईज, 40 मनगटी घडय़ाळे, असंख्य पेन सेटस् त्याशिवाय कॅमेरा, डिजी टॅब,डिव्हीडी, लॅपटॉप, डिजिटल डायरिज अशा वस्तू सापडल्या होत्या. या प्रकरणात सीबीआयने फर्नाडिस यांच्या विरोधात भादंसंच्या 109 तसेच पासपोर्ट कायदा 1988 च्या 13(2) यासह 13(1)ई या कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. त्यावेळी आपली सफाई देताना फर्नांडिस यांनी आपल्याला या सर्व वस्तू भेट म्हणून मिळाल्या होत्या, असा खुलासा केला होता.