बलात्कार प्रकरणात बाबूश मोन्सेरातवर आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 09:48 PM2018-07-18T21:48:07+5:302018-07-18T21:48:43+5:30
माजी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध पणजी महिला पोलीसांकडून पणजी विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल
पणजी - युवतीवरील बलात्कार प्रकरणात माजी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध पणजी महिला पोलीसांकडून पणजी विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. मन्सेरातवर बलात्काराचा आरोप तर त्यांना साथ दिल्याबद्दल रोझी फेर्रोस या महिलेवरही आरोपपत्र ठेवण्यात आले आहे.
२ वर्षापूर्वी घडलेल्या युवतीवरील बलात्कार प्रकरणात अखेर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र सुमारे २०० पानी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच ४० जणांच्या साक्षी त्यात नोंदविण्यात आल्या आहेत. बाबूश मोन्सेरात हे त्यावेळी सांताक्रूझ मतदारसंघाचे आमदार होते. आता ते भाजप सरकारचा घटक पक्ष असलेले गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि सरकारच्या ग्रेटर पणजी नियोजन व विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष आहेत.
५ मे २०१६ मध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात मोन्सेरात यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी १३ दिवस त्यांना तुरुंगात काढावे लागले होते. युवतीच्या आईला ५० लाख रुपये देऊन तिला विकत घेण्यात आल्याचेही म्हटले होते. युवतीला पेयातून गुंगीचे औषध पाजले व नंतर बलात्कार केल्याचा दावा तक्रारीत केला होता. पीडित मुलगीच स्वत: तक्रारदार असून पणजी महिला पोीलस स्सथानकात येवून तिने तक्रार नोंदविली होती. या घटनेच्या वेळी ही युवती १६ वर्षांची होती असा तिचा दावा होता. परंतु आरोपपत्रात ती अल्पवयीन असल्याचे कठेही म्हटलेले नाही आणि बाल कायद्याखालीही आरोप ठेवण्यात आले नाहीत. भारतीय दंडसंहिता कलम ३७८ अंतर्गत बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पीडितेच्या आईला वगळले
बलात्कार प्रकरणात बाबूश मोन्सेरात यांच्यावर आणि रोझीवर आरोपपत्रात ठपका ठेवण्यात आला असला तरी पीडितेच्या आईला मात्र आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे. तिच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्यामुळे तिला वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तिने ५० लाख रुपये घेऊन युवतीची मोन्सेरात यांना विक्री केली होती असा ठपका यापूर्वी पोलिसांनी तिच्यावर ठेवला होता आणि तिला अटक करून तुरुंगातही ठेवण्यात आले होते. एवढे करून तिला आता सोडण्याची नामुष्की पोलिसांवर आली आहे.