गोव्याच्या क्रीडामंत्र्यांवर आरोपपत्र
By admin | Published: June 10, 2016 07:31 PM2016-06-10T19:31:26+5:302016-06-10T19:38:19+5:30
काणकोण वन अधिकाऱ्यांनी २00९ मध्ये अटक केलेल्या दोघा संशयितांना बळजबरीने वन अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सोडवून नेल्याचा आरोप असलेले गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर
सात वर्षांनी कार्यवाही : बळजबरीने आरोपीस नेल्याचे २००९ मधील प्रकरण
मडगाव : काणकोण वन अधिकाऱ्यांनी २00९ मध्ये अटक केलेल्या दोघा संशयितांना बळजबरीने वन अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सोडवून नेल्याचा आरोप असलेले गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यासह आठ जणांवर शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. काणकोण पोलिसांनी काणकोणच्या प्रथम वर्ग न्यायालयात दंगल माजविणे आणि सरकारी कामात हस्तक्षेप करणे या गुन्ह्यांसह एकूण सहा कलमांखाली आरोपपत्र दाखल केले.
तवडकर यांच्यासह मनोज तलवडकर, गजानन नाईक, संतोष देसाई, राजीव गावकर, दीपक गावकर, जानू तवडकर व दामू नाईक यांच्याविरोधात काणकोण पोलिसांनी भादंसंच्या १४३ (बेकायदा जमाव जमविणे), १४७ (दंगल माजविणे), ४५१ घुसखोरी, ३५३ (सरकारी नोकरांच्या कामात व्यत्यय आणणे) तसेच ४२४ व ४२५ (कोठडीत असलेल्यांना बळजबरीने घेऊन जाणे) या कलमाखाली आरोपपत्र दाखल केले. काणकोणचे उपनिरीक्षक प्रशाल देसाई यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सारिका फळदेसाई यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात काणकोण पोलिसांनी २७ एप्रिल २00९ रोजी तवडकर व इतरांवर गुन्हा नोंद केला होता. दाखल केलेल्या तक्रारीप्रमाणे, काणकोणच्या वन अधिकाऱ्यांनी कारवारच्या दोघाजणांना अटक केली होती. या वेळी तवडकर व त्यांचे समर्थक यांनी वन खात्यावर चाल करून त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन संशयितांना बळजबरीने घेऊन गेले होते. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावे असल्याचा निर्वाळा अभियोग संचालनालयाने दिला असतानाही दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांची परवानगी न मिळाल्यामुळे आरोपपत्र दाखल झाले नव्हते. (प्रतिनिधी)
क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले असल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. यापूर्वी काँग्रेसचे दयानंद नार्वेकर यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले असता, भाजपानेही अशीच मागणी केली होती.
- अॅड. आयरीश रॉड्रिगीस, सामाजिक कार्यकर्ते
मी पैंगीण मतदारसंघाचाआमदार होतो त्या वेळी वन खात्याच्या कार्यालयात दोघांना मारहाण होत असल्याचे मी पाहिले. मारहाण थांबवा असे मी वन अधिकाऱ्यांना सांगितले आणि मारहाणीसंदर्भात तक्रार करण्याच्या सूचना मी संशयितांना केल्या. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी माझ्याच विरोधात तक्रार दिली. त्या वेळी काँग्रेसचे राज्य असल्याने तक्रार दाखल झाली. मी कोणालाही बळजबरीने वन खात्याच्या तावडीतून सोडवून आणले नव्हते.
- रमेश तवडकर, क्रीडामंत्री