गोव्याच्या दाबोळी विमानतळाला चार्टर विमानांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 09:23 PM2020-10-01T21:23:02+5:302020-10-01T21:23:06+5:30

प्रवासी विमाने पुन्हा कधीपासून हाताळण्यास सुरू करायची याचा अजून निर्णय घेतला नसल्याने ऑक्टोबरमध्ये गोव्यात चार्टर विमाने येण्याची शक्यता एकंदरीत शून्य झाली आहे.

Charter flights await at Dabolim Airport, Goa | गोव्याच्या दाबोळी विमानतळाला चार्टर विमानांची प्रतीक्षा

गोव्याच्या दाबोळी विमानतळाला चार्टर विमानांची प्रतीक्षा

Next

पंकज शेट्ये

वास्को: नेहमी ऑक्टोबरच्या सुरुवातीला गोव्यातील पर्यटक हंगामाला सुरुवात झाल्यानंतर विविध राष्ट्रातून विदेशी चार्टर विमाने प्रवाशांना घेऊन गोव्यात यायची. सध्या चालत्या कोरोनाच्या महामीरीमुळे केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने विदेशी प्रवासी विमाने पुन्हा कधीपासून हाताळण्यास सुरू करायची याचा अजून निर्णय घेतला नसल्याने ऑक्टोबरमध्ये गोव्यात चार्टर विमाने येण्याची शक्यता एकंदरीत शून्य झाली आहे.

मागच्या पर्यटक हंगामात विविध राष्ट्रातून ६६६ चार्टर विमाने दाबोळी विमानतळावर दीड लाखांहून जास्त पर्यटकांना घेऊन उतरली होती. यावर्षी केव्हापासून चार्टर विमानांचा हंगाम सुरू होणार ते निश्चित झाले नसल्याने यंदाच्या पर्यटक हंगामात गोव्यात चार्टर विमानांची मागच्या वर्षांच्या तुलनेत बरीच कमतरता होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागच्या काही वर्षांत गोव्यात जसा जसा सप्टेंबर महिना संपण्यास पोहोचायचा तसे तसे गोव्यातील पर्यटक हंगामाची सुरुवात होणार असल्याने गोव्यातील पर्यटक क्षेत्रात असलेले नागरिक विदेशी तसेच राष्ट्रीय पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज व्हायचे. मागील काही वर्षात बहुतेक वेळा गोव्यातील पर्यटक हंगामाला सुरुवात झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात विदेशी चार्टर विमाने पर्यटकांना घेऊन गोव्यात येण्यास सुरू व्हायची.

मागच्या वर्षी (२०१९ - २०) गोव्यातील पर्यटक हंगाम सुरू झाल्यानंतर २ ऑक्टोबरला रशियातून पहिले चार्टर विमान सुमारे ३५० पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर उतरले होते. गेल्या वर्षी गोव्यातील पर्यटक हंगामा काळात दाबोळी विमानतळावर रशिया, युके, युक्रेन, पोलंड, इराण इत्यादी विविध राष्ट्रातून ६६६ विदेशी चार्टर विमाने पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर उतरली. ऑक्टोबर महिन्यात पर्यटक हंगाम सुरू झाल्यानंतर जास्त करून मेपर्यंत चालत असल्याने तोपर्यंत दाबोळी विमानतळावर विदेशी चार्टर यायची.

मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केल्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीसपासून दाबोळी विमानतळावर विदेशी चार्टर बंद झाल्याने मागच्या पर्यटक हंगामातसुद्धा काही प्रमाणात याचा पर्यटक क्षेत्रातील व्यवसायांना फटका बसला. या वर्षी ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, गोव्यात विदेशी चार्टर विमाने कधीपासून येण्यास सुरू होणार याबाबत माहिती घेण्यासाठी दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता, सध्या याबाबत काहीच सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

देशात पुन्हा केव्हापासून विदेशी प्रवासी विमाने हाताळण्यास सुरू होणार याचा निर्णय केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने घेतल्यानंतरच यंदाच्या पर्यटक हंगामात गोव्यात कधी पासून चार्टर विमाने येण्यास सुरू होणार हे सांगता येईल, असे मलिक यांनी सांगितले. यंदाच्या पर्यटक हंगामात अजूनपर्यंत विविध राष्ट्रातील (रशिया, युके इत्यादी) चार्टर विमान हाताळणाºया कंपनींनी सुमारे ४०० चार्टर विमाने प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावर उतरवण्याची परवानगी मागितली आहे. मात्र उड्डाण मंत्रालयाने विदेशी विमाने देशात कधीपासून पुन्हा सुरू करावीत याचा निर्णय घेतल्यानंतरच गोव्यात चार्टर विमाने कधीपासून येण्यास सुरू होणार हे सांगण्यास शक्य होणार असल्याचे गगन मलिक यांनी सांगितले.

सध्याची स्थिती पाहता यावर्षी ऑक्टोबर महिन्यात गोव्यात विदेशी चार्टर विमाने येण्याची शक्यता कमीच झाली आहे. यामुळे गोव्यातील यंदाच्या पर्यटक हंगामाला आर्थिक दृष्ट्या ब-याच प्रमाणात मारा बसण्याची काही जणांकडून शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या विदेशी क्रूज जहाजेही नाहीत

गोव्याचा पर्यटक हंगाम सुरू झाल्यानंतर मागच्या काही वर्षात ऑक्टोबर महिन्यात मुरगाव बंदरात शेकडो विदेशी पर्यटकांना घेऊन विदेशी क्रुज जहाजे येण्यास सुरू व्हायची. विदेशी चार्टर विमानासरखेच विदेशी क्रूज जहाजे पर्यटकांना घेऊन गोव्यात येण्यास सुरू होत असल्याने गोव्यातील पर्यटक हंगामाला आर्थिकदृष्ट्या बराच फायदा व्हायचा. मागच्या पर्यटक हंगाम्यात (२०१९ - २०) मुरगाव बंदरात हजारो विदेशी पर्यटकांना घेऊन २९ विदेशी क्रुज जहाजे आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हा पर्यटक हंगामा चालू असतानाच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर मुरगाव बंदरात येणार असलेल्या २ ते ३ विदेशी क्रूज जहाजे रद्द करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पर्यटक हंगामा सुरू झाल्यानंतर नेहमी ऑक्टोबर महिन्यापासून विदेशी क्रुज जहाजे यायची, मात्र यावर्षी मुरगाव बंदरातही ऑक्टोबर महिन्यात क्रुज जहाजे येण्याची शक्यता विदेशी चार्टर विमानांसारखीच एकंदरीत शून्यच झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यात येणा-या विदेशी क्रुज जहाजांची ‘आयटनरी’ सप्टेंबर महिन्यात मुरगाव बंदरातील संबंधित विभागाला मिळायची, मात्र अजून ती आम्हाला मिळालेली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी देऊन यामुळे ऑक्टोबर महिन्यात मुरगाव बंदरात विदेशी क्रुज जहाजे येण्याची शक्यता कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Charter flights await at Dabolim Airport, Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.