खाण अवलंबितांना चतुर्थीची भेट
By Admin | Published: September 17, 2015 03:23 AM2015-09-17T03:23:04+5:302015-09-17T03:23:21+5:30
पणजी : राज्यातील ट्रकमालक व अन्य खाण अवलंबितांना मिळून सरकारने बुधवारी एकूण २० कोटी रुपये मंजूर केले व त्यांच्या खात्यातही ही रक्कम जमा केली
पणजी : राज्यातील ट्रकमालक व अन्य खाण अवलंबितांना मिळून सरकारने बुधवारी एकूण २० कोटी रुपये मंजूर केले व त्यांच्या खात्यातही ही रक्कम जमा केली. तसेच सामाजिक सुरक्षा योजनेखाली ज्येष्ठ नागरिकांना २६ कोटी ८१ लाख रुपये व गृह आधार योजनेखाली महिलांना १४ कोटी ८० लाख रुपये बुधवारी मंजूर करून लाभार्थींपर्यंत पोहोचतेही करण्यात आले.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी सायंकाळी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. गेले सात महिने खाणग्रस्त भागातील ट्रकमालकांना शासकीय अर्थसाहाय्य मिळाले नव्हते. आपण चतुर्थीपूर्वी तीन महिन्यांचे अर्थसाहाय्य देण्याची हमी दिली होती. त्यानुसार प्रथम ५ कोटी २७ लाख, मग ५ कोटी १८ लाख व आता ५ कोटी ११ लाख असे मिळून सुमारे साडेपंधरा कोटी रुपये सरकारने मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय खनिज खाणी बंद पडल्याने जे युवक बेरोजगार बनले होते, त्यांनाही सरकारी योजनेंतर्गत बुधवारी आपण ४ कोटी ४८ लाख रुपये मंजूर केले, असे पार्सेकर यांनी सांगितले. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आणि गृह आधार योजनेच्या लाभार्थींचेही सरकार देणे होते. बुधवारी तो विषयही निकालात काढून लाभार्थींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले. याशिवाय ऊस उत्पादकांचा विषय विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात आला होता.
१३९ ऊस उत्पादकांना आधारभूत किंमत मिळालेली नाही, असा मुद्दा आमदार सुभाष फळदेसाई यांनी मांडला होता. या सर्व उत्पादकांना सरकारने बुधवारी ५८ लाख ४८ हजार रुपये मंजूर केले. ऊस उत्पादकांना ही रक्कम येत्या २३ तारखेपर्यंत मिळेल. पशुसंवर्धन, कृषी व मच्छीमार योजनांखाली एकूण १३ कोटी ३३ लाख रुपये सरकारने मंजूर केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)