भाजपचे डीजीपींकडील कनेक्शन तपासा; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची मागणी
By किशोर कुबल | Published: June 28, 2024 02:47 PM2024-06-28T14:47:24+5:302024-06-28T14:47:31+5:30
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी पत्रकारांचे प्रश्न का टाळले? असा प्रश्न करून आसगाव प्रकरणाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणे आवश्यक असल्याचे युरी म्हणाले.
किशोर कुबल
पणजी : डीजीपींवरील खळबळजनक आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी आधी भाजपचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याकडे असलेले कनेक्शन तपासा, अशी मागणी केली. ते म्हणाले की, पोलीस महासंचालकांचा सहभाग हे फक्त 'हिमनगावरचे टोक' आहे. या प्रकरणात 'बीजेपी ते डीजीपी'पर्यंतच्या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे. भाजप जमीन आणि रिअल इस्टेट माफियांना संरक्षण देते, हे यावरून उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी पत्रकारांचे प्रश्न का टाळले? असा प्रश्न करून आसगाव प्रकरणाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणे आवश्यक असल्याचे युरी म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की या प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्याचा आत असल्याचा आरोप सर्वप्रथम काँग्रेसचे हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला होता, ते आज खरे ठरले आहे. जसपाल सिंग यांच्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने ताबडतोब कारवाई करावी.'
लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार - खासदार विरियातो फर्नांडिस
दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी आपण हा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, डीजीपींवरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. ते जेवढी वर्षे गोव्यात डीजीपी म्हणून आहेत त्या काळात झालेली ड्रग्सची प्रकरणे असोत किंवा खून अथवा इतर गुन्ह्यांची प्रकरणे, या सर्व बाबतीत चौकशी झाली पाहिजे. कारण अनेकदा लोकांचा असा आरोप होता की, 'खून, दरोडे, ड्रग्सच्या बाबतीत पोलीस कारवाई करत नाहीत. कदाचित डीजीपींच्या दबावामुळेच कारवाई होत नसावी. या सर्व गोष्टींची चौकशी आता व्हायला हवी. मी हा विषय गंभीरपणे लोकसभेत मांडणार आहे.'