सत्यता तपासा, मगच गुन्हा नोंदवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 08:12 IST2025-03-21T08:11:49+5:302025-03-21T08:12:55+5:30
त्या युवतीच्या विसंगत विधानांमुळे पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदविलेला नाही.

सत्यता तपासा, मगच गुन्हा नोंदवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : मडगाव येथील एका पीडित युवतीवरील बलात्कार प्रकरणाचा कसून तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तसेच पीडित युवतीने स्पष्ट भूमिका घेतल्यास या प्रकरणी गुन्हाही नोंदविला जाईल.
मात्र, त्या युवतीच्या विसंगत विधानांमुळे पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदविलेला नाही. पण, पीडितेने स्पष्ट भूमिका घेतल्यास या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दि. २० रोजी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील संशयितास चौकशीदरम्यान अटक केली आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी तस्करीच्या आरोपाखाली मडगाव पोलिसांनी शबरीश मांजरेकर (रा. बोर्डा, ३२) या संशयिताला चौकशीसाठी बोलावण्यात आले.
चौकशीदरम्यान संशयित परवानाधारक कंत्राटदार असल्याचे सांगून शेजारील राज्यातील मुलींना गोव्यात चांगली नोकरी देतो, असे आमिष देऊन इथे आणत होता. प्रत्यक्षात तो कायदेशीर परवानाधारक नसल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले. दरम्यान, अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यात हा मुद्दा उपस्थित होणार आहे.