सीमांवरच वाहनांची कागदपत्रे तपासणार, मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 07:05 PM2019-12-17T19:05:14+5:302019-12-17T19:06:01+5:30
नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक डिसेंबर अखेरीस गोव्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
पणजी - गोव्यात येणाऱ्या वाहनांची कागदपत्रे राज्याच्या सीमांवरच एकदा तपासायची व पुन्हा पुन्हा शहरांमध्ये ही वाहने थांबवून कागदपत्रे तपासायची नाहीत अशा पद्धतीचे धोरण सरकार आखत आहे. यापुढील काळात हे धोरण अंमलात येईल. नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक डिसेंबर अखेरीस गोव्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही बैठकीत भाग घेतला. मंत्रलयात झालेल्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्रंकडे लक्ष द्यावे अशी सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केली. नाताळ व नववर्षाच्या कालावधीत अपघात घडू नये तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ब्लॅक स्पॉट्स तथा अपघातप्रवण क्षेत्रंच्या ठिकाणी लक्ष असावे असे त्यांनी सूचविले. जिथे जास्त वाहतूक कोंडी होते, अशा ठिकाणी ज्यादा वाहतूक पोलिस नेमले जावेत. त्यासाठी वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला जावा, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस खात्याला केली.
आवश्यक त्या सगळ्या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलिस ठेवले जावेत. सुरक्षेच्या कारणावरून लोकांशी बोलताना पोलिसांनी तसेच वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांशी संवाद साधताना सौजन्याने व नम्रपणो वागावे अशीही अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत व्यक्त केली. पर्यटकांना अकारण त्रस होईल, त्यांचा छळ होईल अशा प्रकारे पोलिसांनी वागू नये. कारण लाखो देश- विदेशी पर्यटक या काळात गोव्यात असतात. त्यांनी परत जाताना गोव्याविषयी मनात चांगली प्रतिमाच घेऊन जायला हवी असे सरकारला वाटते.
उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठकीत भाग घेतला. गोव्यात आता परप्रांतांमधून येणारी वाहने सर्व ठिकाणी थांबवून त्यांची कागदपत्रे तपासली जातात. नव्या वर्षी सरकार नवे धोरण तयार करील, ज्याद्वारे पोलिसांनी केवळ सीमेवर एकदाच वाहनांची तपासणी करावी असे अपेक्षित असेल. दरम्यान, या बैठकीनंतर दुपारी मुख्यमंत्री सावंत दिल्लीस रवाना झाले. दिल्ली भेटीत ते केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटून म्हादई पाणीप्रश्नी चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचीही मुख्यमंत्री भेट घेतील.