छत्रपतींचा वाद पोहोचला कोर्टात; धर्मगुरूची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 02:46 PM2023-08-06T14:46:05+5:302023-08-06T14:46:49+5:30
मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव:छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चिखली चर्चचे धर्मगुरू फा. बोलमॅक्स परेरा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. शनिवारी त्यांनी मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व आहे की देव आहे, हे पहिल्यांदा ठरवावे,' असे वक्तव्य फा. परेरा यांनी केले होते. त्यानंतर राज्यभरातून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. चूक लक्षात आल्यानंतर फा. बोलमॅक्स यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शेर्मावात करण्यामागील हेतू शुद्ध होता. महाराज हे धर्म, जाती आणि प्रांत भेदापलीकडले राष्ट्रीय होते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीचे वादग्रस्त वक्तव्य फा. बोलमॅक्स परेरा यांना बरेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. मुरगावात तणाव निर्माण होण्यापासून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक चुकविण्यासाठी त्यांना कोर्टच्या चकरा मारण्यास भाग पाडले. गोव्यातील समान नागरी कायदा जसा संपूर्ण देशात वैशिष्ठ्यपूर्ण आहे. तसेच येथील धार्मिक सलोखाही देशाने आदर्श घ्यावा असाच आहे. परंतु, अधुनमधून काहीजण धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्येही हा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेकडो शिवप्रेमींनी वास्को पोलिसांत धाव घेऊन त्यांना गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले. फा. बोलमॅक्स यांना समज देणारे व्हिडिओ व्हायरल केले. त्यापैकी समाजकार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांचा व्हिडिओ अधिक व्हायरल झाला आहे. त्यांनीही फा. बोलमॅक्स यांना सुनावत धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन केले.
उद्या सुनावणी
शुक्रवारी रात्री वास्को पोलिस ठाण्याच्या समोर हिंदुत्ववादी कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते. त्यांच्या दबावानंतर पोलिसांनी फा. बोलमॅक्स परेरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर फा. बोलमॅक्स यांनी काल अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयात अर्ज केला असून सोमवार, दि. ७ रोजी सुनावणीस येणार आहे. त्यांच्यावतीने वकील ए. आंद्राद हे युक्तीवाद करतील.
पोर्तुगिजांनी हेच केले होते
हिंदू धर्मियांनी कुणाला देव मानावे आणि कुणाला मानू नये हे इतरांना सांगण्याची गरज नाही. कोण कोणाला देव मानेल किंवा मानणार नाही हे ठरविण्याचा हक्क ज्याला त्याला आहे. त्यात कुणीच हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. हीच धार्मिक सक्ती पोर्तुगिजांनी ४५० वर्षांपूर्वी केली होती आणि त्याबद्दलचा राग अजून हिंदू धर्मियांत कायम आहे. त्यामुळे या समाजाला आणखी दुखविण्याचा प्रयत्न करू नका, असे ऑस्कर रिबेलो यांनी फादर बोलमॅक्स यांना सुनावले आहे.
वक्तव्य करताना भान ठेवा
गोव्यात राहणारे नागरिक शांतताप्रिय असून, त्यामुळेच बाहेरील राज्यांत गोमंतकीयांना मोठा मान दिला जातो. जे लोक वक्तव्य करून समाजात तणाव निर्माण करतात, त्यांनी स्वतःला आवर घालावा. आपण करत असलेल्या वक्तव्यातून दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याचे भान ठेवावे, असे आवाहन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केले आहे.