छत्रपतींच्या पुतळ्याचा वाद शमेना! सरपंच जोझफ सिक्वेरा म्हणतात, वादाला शिवस्वराज्य संघटना जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 09:52 AM2023-06-24T09:52:31+5:302023-06-24T09:53:21+5:30
छत्रपतींचा पुतळा हटवण्याची नोटीस सोमवारी पंचायतीने दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरून उठलेल्या वादंगाला शिवप्रेमी जबाबदार नसून शिवस्वराज्य कळंगुट या संस्थेचे अध्यक्ष जबाबदार ठरल्याचा आरोप सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी केला आहे. पुतळ्याला पंचायतीचा आक्षेप नव्हता, मात्र चुकीच्या जागी त्याची उभारणी करण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
छत्रपतींचा पुतळा हटवण्याची नोटीस सोमवारी पंचायतीने दिली होती. दिलेल्या नोटिशीला विरोध करून ती मागे घेण्यात यावी तसेच सरपंचांनी माफी मागावी, अशी मागणी करून शिवप्रेमी मंगळवारी पंचायती परिसरात जमा झाले होते. घडलेल्या प्रकारावर सिक्वेरा यांनी पंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. त्यांच्यासोबत गीता परब व इतर पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी सिक्वेरा यांनी काही कागदपत्रे पत्रकारांसमोर ठेवली.
पंचायतीकडून पाठवलेल्या नोटिशीवर खुलासा करताना सिक्वेरा म्हणाले, पंचायतीने महाराजांचा पुतळा १० दिवसांत हटवण्यात यावा, अशा प्रकारची नोटीस शिवस्वराज्य संस्थेला पाठवली होती. या नोटिशीत कुठेही महाराजांचा पुतळा जमीनदोस्त करण्यात यावा, असा उल्लेख केला नव्हता. मात्र पंचायतीकडून दिलेल्या नोटिशीचा चुकीचा अर्थ लावून चुकीची माहिती पसरवण्यात आल्याने प्रकरण भडकल्याचे सिक्वेरा म्हणाले. त्यातून गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील शिवप्रेमी जमा होण्यास कारण ठरल्याचे त्यांनी सांगितले.
'ती' जागा धोकादायक
साळगांव-कळंगुट रस्त्यावर पोलिस स्थानकाजवळील ज्या जागेत पुतळा उभारण्यात आला तेथे पाच रस्ते एकत्रित येतात. त्यामुळे ती जागा अपघातप्रवण क्षेत्र आहे. परिसरात अंधार असल्याने तेथे हायमास्ट घालण्याचा ठरावही पंचायतीने एप्रिल महिन्यात घेतला होता. एका रात्रीत पुतळा उभारताना कोणत्याच प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याने धोकादायक जागेवरून तो हटवण्यात यावा, असेही त्यात म्हटल्याचे सिक्वेरा म्हणाले.
पोलिसांनी दुर्लक्ष केले
संस्थेला नोटीस पाठवताना पंचायत मंडळाने घेतलेल्या ठरावाची प्रत तसेच पुतळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रतही जोडण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. सदर नोटिशीच्या प्रती उपजिल्हाधिकारी तसेच इतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या होत्या. पत्राची योग्य दखल घेण्याची सूचना उपजिल्हाधिकायांनी पोलिस अधीक्षकांना केली होती. पण त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याने वाद चिघळल्याचे सिक्वेरा म्हणाले.
संघटनेने भडकवले
पुतळ्याची उभारणी केल्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी पंचायतीने शिवस्वराज्य संघटनेला निमंत्रित केले होते. त्यांना पर्यायी जागाही सुचविण्यात आलेली. वर्षभरापूर्वी वेगळ्या जागी महाराजांचा पुतळा ठेवून त्याचे पूजन केले होते. पण प्रत्यक्षात वेगळ्याच जागेवर त्याची उभारणी केली.
मीही शिवप्रेमी
कळंगुट परिसरातील वस्तुस्थितीची जाण राज्याबाहेरील शिवप्रेमींनी नसल्याने त्या दिवशी जे काही घडले त्याला बाहेरील शिवप्रेमी जबाबदार नाहीत. त्यांची दिशाभूल करण्यात आल्याने ते भडकले. याला शिवस्वराज्य संघटना जबाबदार आहे. आपणही शिवप्रेमी असून आपले शिक्षण मराठीतून झाले असल्याची माहिती सरपंच सिक्वेरा यांनी दिली.
आंदोलनातील दोन पंच पुतळा हटवण्याच्या ठरावाला उपस्थित
आंदोलनात सहभागी झालेले दोन पंच सदस्य पंचायतीने मांडलेल्या शिवरायांच्या पुतळा हटविण्याच्या ठरावावेळीही उपस्थित होते, असे सरपंच जोझेफ सिक्वेरा यांनी स्पष्ट केले आहे. हा निर्णय पंचायत मंडळाचा होता, माझा एकट्याचा नव्हे. आंदोलनात सहभागी झालेल्या दोन पंच सदस्यांच्या सह्याही ठरावावर आहेत. त्या दिवशी माफी मागण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली. ठराव घेताना सर्व पंच सदस्य उपस्थित होते. हा वन मॅन शो नव्हता. पुतळ्याच्या विषयावर मी अजूनही शिवप्रेमींकडे चर्चेसाठी तयार आहे, असे सिक्वेरा म्हणाले.
सरपंच चुकलेच!
कळंगुटमधील शिवरायांचा पुतळा हटवण्याच्या ग्रामपंचायतीच्या ठरावाबद्दल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रथमच भाष्य करताना सरपंच चुकलेच, असे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि शिवरायांची तुलना आणखी कोणत्याही नेत्याशी होऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांना छत्रपती म्हटले जाते. असे ढवळीकर म्हणाले. आता जोझेफ यांना छत्रपती किती कळले ठाऊक नाही. परंतु ढवळीकर यांनी कानात अंजन ओतले हेही कमी नाही. जोझेफनी माफी मागितली आहे, त्यामुळे आता विषय संपायला हवा, असे लोकांना वाटते.
घाईगडबडीत पुतळा बसवला ते चुकीचे: लोबो
कळंगुट येथे घडलेला प्रकार म्हणजे राज्यात चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा प्रकार असल्याचे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले आहे. संबंधीची माहिती चुकीच्या पद्धतीने पसरली. महाराजांचा पुतळा हटवला जाईल, असा संदेश सर्वत्र पसरवण्यात आला. हा प्रकार अत्यंत समंजसपणे सोडवायला हवा होता. तसेच घाईगडबडीने पुतळ्याची उभारणी करायला नको होती. पुतळा उभारणीला माझ्यासह कोणाचीही हरकत नाही. पण, ज्या पद्धतीने हे घडले यातून समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरु असल्याचे लोबो म्हणाले.
छत्रपतीविरोधात पोस्ट; महिलेविरुद्ध तक्रार दाखल
मडगाव : छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर व पोस्ट टाकल्याप्रकरणी मडगाव येथील बजरंग दलाने लेनिफा डिसोझा या महिलेविरोधात मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या कृत्याने धार्मिक भावना दुखवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे संशयितावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे.