गोव्यातील आरोग्य सुविधा शेजारील राज्यांपेक्षा दर्जेदार, मुख्यमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 06:49 PM2020-02-10T18:49:24+5:302020-02-10T18:53:02+5:30
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील सर्व रुग्णांना चांगल्या सोयी पुरविल्या जातात. मात्र, गोव्याबाहेरील आरोग्य केंद्रात असे चित्र बघायला मिळणार नाही
म्हापसा : गोव्यातील आरोग्य सुविधा या शेजारच्या राज्यापेक्षा खूपच दर्जेदार आहेत. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील सर्व रुग्णांना चांगल्या सोयी पुरविल्या जातात. मात्र, गोव्याबाहेरील आरोग्य केंद्रात असे चित्र बघायला मिळणार नाही. तिथे बाहेरील रुग्णांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले जाते. परंतु गोव्यात सर्व रुग्णांना एकसमान सुविधा दिल्या जातात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
आज सोमवारी सकाळी कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विद्यमान संरचनेचा विस्ताराची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कचरा व व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, आमदार जोशुआ डिसोझा, कांदोळी सरपंच ब्लेझ फर्नांडिस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, खाण व्यवसाय सुरू असताना सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळायचा. मात्र, पैसे असूनही त्यावेळी तत्कालिन सरकारने राज्याची योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे उभे करून ठेवले आहेत. हा कचरा विद्यमान सरकारकडून साफ केला जात आहे. सोनसडो कचरा प्रकल्प हे याचे उत्तम उदाहरण असून केवळ गोव्यात सर्व प्रकारच्या कचºयाची विल्हेवाट लावली जाते, असेही त्यांनी नमूद केले.
कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राला अद्यायावत करण्याची आवश्यकता होती. कळंगुट मतदारसंघ हा किनारी पट्ट्यात येत असल्याने इथे हजारोंच्या संख्येने पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अतिरिक्त भार पडतो. याशिवाय इथे आधुनिक आरोग्य सुविधा नसल्याने आपत्कालिन वेळी रुग्णांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात पाठवावे लागते. त्यामुळे या आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण करणे गरजेचे होते, असे मनोगत मंत्री मायक ल लोबो यांनी व्यक्त केले.
गोव्यात पुढील सरकार हे भाजपाचेच असल्याने पक्ष सोडण्याचा किंवा नवा पक्ष काढण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी केले. तसेच कुणीही दिशाभूल करू न घेवू नये. त्याचप्रमाणे लोकांना वाद निर्माण करणारे सरकार नको, तर काम करणारे सरकार हवे असल्याचे मत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केले.