...तर गोव्याचे मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 01:14 PM2018-09-11T13:14:09+5:302018-09-11T13:14:17+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अजूनही आजारी आहेत. ते अमेरिकेहून तिस-यांदा वैद्यकीय उपचार घेऊन गोव्यात परतले तरी, त्यांचे आरोग्य त्यांना हवे त्या प्रमाणात साथ देत नाही.

Chief Minister of Goa can be changed | ...तर गोव्याचे मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात

...तर गोव्याचे मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात

googlenewsNext

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अजूनही आजारी आहेत. ते अमेरिकेहून तिस-यांदा वैद्यकीय उपचार घेऊन गोव्यात परतले तरी, त्यांचे आरोग्य त्यांना हवे त्या प्रमाणात साथ देत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री मंगळवारीही मंत्रालयात येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीत पूर्णतः सुधारणा होईपर्यंत गोव्यातील सरकारमध्ये नेतृत्व बदल केला जाऊ शकतो, मुख्यमंत्री म्हणून नवा नेता निवडला जाऊ शकतो, अशी माहिती भाजपाच्या गोटातून प्राप्त होत आहे.

गोवा प्रशासन ठप्प झाले असून येत्या लोकसभा निवडणुकीवेळी ही स्थिती आम्हाला मारक ठरेल, अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री गेले अनेक दिवस मंत्रालयात येऊ शकलेले नाहीत. आधी मुख्यमंत्री मुंबईतील इस्पितळात उपचार घेत होते. मग ते आठ दिवस उपचारांसाठी मुंबईहूनच अमेरिकेतील स्लोन केटरींग इस्पितळात गेले होते. गेल्या गुरुवारी मुख्यमंत्री गोव्यात परतले पण त्यांच्या आरोग्याविषयीच्या तक्रारी सुरूच आहेत. मुख्यमंत्री आजारातून पूर्णतः बरे झालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी घरीच राहणे पसंत केले आहे.

मुख्यमंत्री लोकांमध्ये आले तर जंतूससंर्ग होण्याचा धोका असतो व त्यामुळे त्यांनी घरीच राहणे पसंत केले आहे, अशी माहिती भाजपाच्या कोअर टीमशीसंबंधित काहीजणांकडून लोकमतला मिळाली. पर्वरी येथील मंत्रालयात मुख्यमंत्री सोमवारीही आले नाहीत व मंगळवारीही सकाळी ते येऊ शकले नाहीत. घरीच काही उपचारांची सोय केली गेली आहे. मुख्यमंत्र्यांना खूप थकवाही आलेला आहे. किंचित आरोग्याला बरे वाटते तेव्हा मुख्यमंत्री काही फाईल्स निकालात काढतात, असे त्यांच्या सेवेतील कर्मचा-यांनी सांगितले.

मात्र भाजपाच्या कोअर टीमशी मुख्यमंत्र्यांचा संवादच अलिकडे खूप कमी झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याच्या स्थितीविषयी कोअर टीमला नीट माहिती मिळत नाही. मंत्रिमंडळाचे एकूण तीन सदस्य आजारी असून ते मंत्रालयात येऊ शकत नाहीत. अशावेळी सरकारमध्ये नेतृत्व बदल व्हायला हवा, असा सूर भाजपामधील एका मोठ्या गटाने लावलेला आहे. सरकारमध्ये यापुढील काळात नेतृत्व बदल होऊ शकतो याची कल्पना काही मंत्र्यांनाही आली आहे. गोवा फॉरवर्ड व मगोप हे दोन पक्ष भाजपाप्रणीत आघाडीचे भाग असून त्यांनी भाजपामधील हालचालींवर आता विशेष लक्ष ठेवले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारातून पूर्ण बरे होऊ द्या व नव्याने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विविध प्रकल्प राबविण्याची संधी मिळू द्या, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे पणजीत मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमावेळी उपस्थित पणजीवासियांसमोर बोलताना म्हणाले. यावेळी माजी आमदार तथा र्पीकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हेही उपस्थित होते.

Web Title: Chief Minister of Goa can be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.