मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता: मंत्री आलेक्स सिक्वेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:39 AM2023-11-21T09:39:15+5:302023-11-21T09:40:29+5:30
कुठले खाते मिळेल, याबाबत अद्यापही अनभिज्ञच
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपमध्ये येताना मला मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपद देण्याचा शब्द दिला नव्हता. मतदारसंघाचा विकास याचेच आश्वासन दिले होते. आपल्याला कुठली खाती मिळतील, हे मला ठाऊक नाही, असे नवनिर्वाचित मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.
काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याच्या प्रक्रियेत कळंगुट मायकल लोबो व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी चर्चा केली होती. त्यामुळे या चर्चेवेळी त्यांना मुख्यमंत्र्यांकडून कोणते आश्वासन मिळाले हे आपल्याला ठाऊक नाही. मात्र, माझे हित राखले जाईल. मतदारसंघाच्या विकासाचे आश्वासन मुख्यमंत्री नक्कीच पूर्ण करतील, असे त्यांनी सांगितले होते.
पक्षांतराचा कठीण निर्णय, पण...
सिक्चेरा म्हणाले की, पक्षांतर करणे हा तसा कठीण निर्णय होता. मात्र, या निर्णयावर मी समाधानी आहे. पक्षांतराचा निर्णय घेताना आपण अनेकांशी चर्चा केली. काहींनी पुन्हा एकदा विचार करा, असेही आपल्याला सांगितले. पक्षांतर करून फसगत झाली, असे काहींना वाटत आहे. त्यासाठी आपण त्यांची यापूर्वीच माफी मागितली आहे. मात्र, भाजपमध्ये जाताना मला मुख्यमंत्र्यांनी कधीही मंत्रीपद देण्याचा शब्द दिला नाही, हे आपण पुन्हा एकदा सांगतो. मतदारसंघाचा विकास हे ध्येय ठेवूनच भाजपमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपला मताधिक्क्य मिळवून देईन
सासष्टीत काँग्रेस प्रमाणेच भाजपलासुद्धा मते मिळतात. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत नावेलीची जागा भाजपने जिंकली. आम आदमी पक्षानेसुद्धा बाणावलीची जागा जिंकली. लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जाईल. उत्तर व दक्षिण गोवा या दोन्ही जागा जिंकून २०२४ मध्ये पंतप्रधानांचे हात बळकट करू, असे सिक्चेरा यांनी सांगितले.
...म्हणून काँग्रेसकडून माझ्यावर आरोप नाही
चर्च संस्थेशी आपली जवळीक आहे, असे म्हणू शकत नाही. आपल्याला प्रश्न करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यांना आपण गृहित धरू शकत नाही. आपण विदेशी नागरिक असल्याचा आरोप काँग्रेस आता करीत नाही. जर आपण विदेशी नागरिक असतो, तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्याला तिकीट कसे दिले? आपण विदेशी नागरिक नाही, हे ठाऊक असल्यानेच त्यांनी तिकीट दिले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.