गोव्यात मुख्यमंत्र्यांकडून कामास आरंभ, अधिकारी व मंत्र्यांकडून गाठीभेटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 07:54 PM2018-06-15T19:54:42+5:302018-06-15T19:54:42+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी पर्वरी येथील सचिवालय तथा मंत्रलयातील आपल्या चेंबरमध्ये येऊन शासकीय कामास आरंभ केला. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मनोहर पर्रीकर यांनी कार्यालयात बसून पुन्हा फाईल्स हातावेगळ्या करणे सुरू केले.

Chief Minister inaugurates work in Goa, officials and ministers meet | गोव्यात मुख्यमंत्र्यांकडून कामास आरंभ, अधिकारी व मंत्र्यांकडून गाठीभेटी

गोव्यात मुख्यमंत्र्यांकडून कामास आरंभ, अधिकारी व मंत्र्यांकडून गाठीभेटी

Next

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी पर्वरी येथील सचिवालय तथा मंत्रलयातील आपल्या चेंबरमध्ये येऊन शासकीय कामास आरंभ केला. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मनोहर पर्रीकर यांनी कार्यालयात बसून पुन्हा फाईल्स हातावेगळ्या करणे सुरू केले. वरिष्ठ अधिकारी व काही मंत्र्यांसोबत  मनोहर पर्रीकर यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

सकाळी मंदिरांमध्ये जाऊन देव दर्शन केल्यानंतर मनोहर पर्रीकर हे थेट मंत्रलयात गेले. तिथे त्यांनी मुख्य सचिव धमेंद्र शर्मा व प्रधान सचिव कृष्णमूर्ती यांच्याशी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, खनिज खाणप्रश्न व अन्य काही विषयांवर ढोबळ स्वरुपाची चर्चा केली. पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांच्याशी मनोहर पर्रीकर यांनी स्मार्ट सिटी व पणजीतील काही कामे याविषयी चर्चा केल्याचे सुत्रांनी सांगितले. मनोहर पर्रीकर दिवसभर मंत्रालयात उपस्थित राहिले. त्यांच्या टेबलवर फाईल्सचा मोठा गठ्ठा होता. फाईल्स हातावेगळ्य़ा करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली.

रोहन, विजय, जयेशची चर्चा... 

कृषी मंत्री विजय सरदेसाई, महसूल मंत्री रोहन खंवटे, बंदर कप्तान खात्याचे मंत्री जयेश साळगावकर हे स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना भेटले. आम्ही पहिल्या दिवशीच कोणत्याच कामांविषयी न बोलता मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीच विचारपूस केली, असे दोघा मंत्र्यांनी लोकमतला सांगितले. मनोहर पर्रीकर यांनी पुढील आठवडय़ात प्रत्येक मंत्री, आमदाराला वेळ दिलेला आहे. तुम्ही तुमच्या खात्यासंबंधीची किंवा मतदारसंघातील विकास कामांविषयीची कामे घेऊन पुढील आठवडय़ात भेटा असे मनोहर पर्रीकर यांनी मंत्री, आमदारांना सांगितले आहे. मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत राज्यात वीजप्रश्नासह अन्य जे काही प्रश्न उपस्थित झाले होते, त्याविषयी मंत्री सरदेसाई यांनी मनोहर पर्रीकर यांना कल्पना दिली. वीजप्रश्नी आपण वीज खात्याच्या अभियंत्यांची बैठक घेणार असल्याचे मनोहर पर्रीकर यांनी सरदेसाई यांना सांगितले.

सोमवारी मंत्रिमंडळ बैठक 

येत्या सोमवारी 18 रोजी मनोहर पर्रीकर हे गोमेकॉत भेट देऊन आरोग्याची तपासणी करून घेतील, असे सुत्रांनी सांगितले. त्याच दिवशी ते मंत्रिमंडळाची बैठकही घेणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसमोर जे विषय मांडायला हवेत, त्याची तयारी मुख्य सचिव करत आहेत. मनोहर पर्रीकर अमेरिकेत असताना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मंत्रिमंडळ सल्लागार समिती (सीएसी) नेमली गेली होती. ती समिती आता रद्दबातल ठरली आहे. समिती रद्द करण्यासंबंधीची फाईल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे शुक्रवारी पाठवून दिली. खनिज खाणींचा विषय व  आंदोलकांचा प्रश्न आमदार दिपक प्रभू पाऊसकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. खाणी लवकर सुरू करता याव्यात असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही येत्या सोमवार किंवा मंगळवारी त्याविषयी जास्त तपशीलाने चर्चा करून पुढील दिशा ठरवूया असे मुख्यमंत्र्यांनी पाऊसकर यांना सांगितले.

Web Title: Chief Minister inaugurates work in Goa, officials and ministers meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.