मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्य वेठीस धरू नये - काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 09:29 PM2018-02-28T21:29:20+5:302018-02-28T21:29:20+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी लपवाछपवी करणे हे भाजपाला व राज्य प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील शोभादायक नाही. पर्रीकर यांच्याशिवाय राज्य चालू शकत नाही, असे चित्र मुख्यमंत्री व भाजप मिळून तयार करत आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी लपवाछपवी करणे हे भाजपाला व राज्य प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना देखील शोभादायक नाही. पर्रीकर यांच्याशिवाय राज्य चालू शकत नाही, असे चित्र मुख्यमंत्री व भाजप मिळून तयार करत आहे. प्रशासन ठप्प झालेले असून राज्य आर्थिक, खनिज व्यवसाय व अन्य आघाड्यावर संकटात आहे. अाशावेळी मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या दुस-या एखाद्या सहका-यांकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी बुधवारी येथे केली.
मनोहर पर्रीकर यांनी राज्याला व प्रशासनाला वेठीस धरू नये असा सल्ला त्यांनी दिला. येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, की मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यामुळे आम्हाला सर्वानाच सहानुभूती आहे. आम्ही वेळोवेळी सहानुभूती दाखवली. मात्र राज्यातील स्थिती आता नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली असून राज्य कर्जाच्या खाईत आहे. सरकारने याविषयी श्वेतपत्रिका जारी करावी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याबाबतही सरकारने व भाजपने माहिती लोकांसमोर ठेवताना पारदर्शकता दाखवावी.
नाईक म्हणाले, की मनोहर पर्रीकर यांचा भाजपावरही विश्वास नाही आणि कुठच्याच मंत्री व आमदारावरही विश्वास नाही. सरकारमधील घटक पक्षांचीही मुख्यमंत्र्यांना भीती वाटते व त्यामुळे ते मुंबईहून अत्यंत घाईत धावतपळत गोवा विधानसभेत आले. आपण नाही तर आणखी कुणीच राज्य चालवू शकत नाही, असे चित्र मुख्यमंत्री तयार करत आहेत. आरोग्य साथ देत नसेल तर मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा त्यांच्या एखाद्या सहका-याकडे द्यावा. कारण जलदगतीने खनिज खाणप्रश्नी, कोळसा प्रदूषण, राज्याची आर्थिक स्थिती याविषयी निर्णय होणे गरजेचे आहे. खाण खात्यासह तेवीस खाती मनोहर पर्रीकर यांच्याकडे आहे. खाण आणि गृह या खात्यांचा ताबा तातडीने दुस-या एखाद्या मंत्र्याकडे देणे गरजेचे बनले आहे. अशा प्रकारे राज्याला वेठीस धरू नका, तुम्ही आत्मपरीक्षण करा, असा सल्ला नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. भाजपाचे आमदार सध्या मनोहर पर्रीकर यांना कोणताच सल्ला देण्याच्या स्थितीत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा सभापतींवरही विश्वास नाही. राज्य संकटात सापडले असून सगळी प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय राज्य चालू शकत नाही असे भासविण्याचा प्रयत्न हा घातक आहे, असे नाईक म्हणाले.